Team My Pune City – मल्टीनॅशनल IT कंपनीकडून संगणक अभियंत्यांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक (Bavdhan Khurd)केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ७५ तरुण अभियंत्यांना नोकरीचे खोटे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. पीडितांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात तक्रार मांडल्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर या IT कंपनी व संबंधित मानव संसाधन सल्लागार फर्मच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, बावधन खुर्द येथील IT कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मागरपट्टा येथील एका मानव संसाधन सल्लागार फर्मचा चालक यांनी संगणक अभियंत्यांची फसवणूक करण्याचा डाव आखला. सी-डॅक कोर्स पूर्ण केलेल्या एका तरुण अभियंत्याने नोकरीसाठी या सल्लागार फर्मचा संपर्क साधला असता, चालकाने त्याला कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यानंतर संबंधित अभियंत्याची IT कंपनीच्या CEO आणि मॅनेजरशी ओळख करून देण्यात आली. कंपनीचे यूएस, यूएई आणि यूकेमध्ये शाखा असल्याचे सांगण्यात आले. मुलाखतीनंतर त्याला ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर नियुक्त केले जाईल असे सांगण्यात आले आणि ८ ऑगस्ट २०२४ रोजी फर्मकडे एक लाख रुपये भरल्यानंतर त्याला ऑफर लेटर ई-मेलद्वारे पाठवण्यात आले.
संबंधित अभियंता २ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत कंपनीत काम करीत होता; परंतु अचानक त्याला कोणतीही कारणे न देता नोकरीवरून कमी करण्यात आले आणि दोन महिन्यांचे वेतन देण्यास नकार देण्यात आला.
Devendra Fadnavis: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Talegaon: तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!
करोडोंचा घोटाळा उघड
या फसवणुकीचा मोठा व्याप पोलिस तपासात उघडकीस येत आहे. आतापर्यंत किमान ७५ अभियंत्यांना अशाच पद्धतीने फसवले असल्याचे समोर आले असून, केवळ पाच कर्मचाऱ्यांकडूनच सुमारे ९ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. Forum for IT Employees चे अध्यक्ष पवनजित माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण नुकसानाची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सर्व कर्मचार्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यांना Provident Fund नोंदणीसारखे कायदेशीर लाभही नाकारण्यात आले, अशी माहिती पीडितांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीचा CEO आणि HR फर्मचा चालक यांनी मिळून तरुण अभियंत्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून काही महिन्यांपर्यंत काम करवून घेतले आणि नंतर वेतन न देता काढून टाकले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
पोलिसांनी प्राथमिक तपासात हे गंभीर आर्थिक फसवणूक प्रकरण असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये कंपनीशी संबंधित दस्तऐवज, बँक व्यवहार, ई-मेल संवाद इत्यादींची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) आणि ५०६ (धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर संभाव्य पीडितांनीही पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





















