Team MyPuneCity : बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने वाहन अपघात प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व वाहन सोडवून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितल्याप्रकरणी (Baramati ACB Trap) ॲन्टी करप्शन ब्युरोच्या (ACB) पुणे विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदाराचे वाहन अपघातग्रस्त झाल्यानंतर त्या प्रकरणी गुन्हा नोंदवू नये व वाहन लवकर परत मिळावे यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील माणिक जगताप (वय ५६, बारामती पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी सुरुवातीला ₹१५,००० व तडजोडीनंतर ₹१०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. या मागणीला खाजगी इसम प्रवीण भाऊसाहेब भोसले (वय ३९) यानेही मदत केली होते.
तक्रारदाराने ही तक्रार ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे येथे १८ मार्च २०२५ रोजी दाखल केली होती. त्यानंतर १८, १९, २० आणि २४ मार्च २०२५ रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान आरोपी सुनील जगताप यांनी लाचेची मागणी निश्चित केल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा (Baramati ACB Trap) नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांच्या (Baramati ACB Trap) नेतृत्वाखाली पार पडली.
लाच मागणीसंदर्भात कुणालाही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय पैसे मागितल्यास नागरिकांनी त्वरित ACB कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.