Team My Pune City – बाणेर भागातील एका सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
लहू गुलाब क्षीरसागर (वय 66 रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत क्षीरसागर यांचा मुलगा अमोल (वय 34) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदारासह सोसायटीतील अध्यक्ष, तसेच चिटणीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार
Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील ऋतुरंग पार्क परिसरात सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या वाढल्या होत्या. फांद्या तोडण्याचे काम सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे दिले होते. 27 जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लहू क्षीरसागर हे झाडावर चढले. फांद्या कापत असताना त्यांचा तोल जाऊन कोसळले. क्षीरसागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ठेकेदार, तसेच सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी झाडाच्या फांद्या तोडताना पुरेशी सुरक्षाविषयक साधने पुरविली नाहीत. बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली, असे अमोल क्षीरसागर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करत आहेत.