Team MyPuneCity – विधानसभा उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या वाहनाला आज सांयकाळी लोणावळा घाटात किरकोळ अपघात झाला. लँड रोव्हर डिफेंडर या गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, बनसोडे यांनी नियोजित मुंबईतील बैठकीस वेळेवर हजेरीही लावली.
सविस्तर माहितीनुसार, अण्णा बनसोडे हे आज दुपारी ३.३० वाजता काळभोरनगर, आकुर्डी येथील कार्यालयातील बैठक संपवून पुढील नियोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्या ताफ्यात पुढे पोलिसांची गाडी, मध्ये बॉडीगार्ड्सची गाडी आणि त्यानंतर बनसोडे स्वतः लँड रोव्हर डिफेंडर या वाहनाने प्रवास करत होते.
सुमारे ४.३५ वाजण्याच्या सुमारास लोणावळा घाटात पोलिसांच्या गाडीच्या अगोदर असलेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने पोलिसांच्या गाडीचा वेग कमी झाला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या गाडीचा पोलिसांच्या गाडीला किरकोळ धक्का लागला. या धडकेत कोणत्याही व्यक्तीस जखम झाली नसून, दोन्ही वाहनांचे थोडे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर काही काळ ताफा थांबवण्यात आला होता, मात्र परिस्थिती नियंत्रणात येताच पुन्हा प्रवास सुरू करण्यात आला. रात्री ७ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीला अण्णा बनसोडे यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून सहभाग नोंदवला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
अपघाताबाबत स्वतः अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून माहिती देताना सांगितले, “आज पुण्याहून मुंबईकडे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी जात असताना माझ्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत.”
तसेच त्यांनी आपल्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या हितचिंतकांचे मनापासून आभार मानत म्हटले आहे की, “मी पूर्णपणे सुखरूप असून, नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.”
या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करणारे संदेश मोठ्या प्रमाणात दिसून आले. मात्र, अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी स्वतः पुढे येत सर्वांना आश्वस्त केल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.