धर्मशाळा व कार्यालयांच्या पार्किंगचा प्रश्न (Alandi Parking Issue) ग्रामस्थांनी सोडवावा : सतीश नांदुरकर
Team MyPuneCity – एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात दर्शनासाठी आलेले भाविक आणि लग्न सराईच्या कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली असून, यामुळे शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनं उभी केल्याने (Alandi Parking Issue) आणि चालकांनी डबल लाईनमध्ये वाहने लावल्यामुळे काल (२३ मे) दुपारी वडगाव रस्ता, चाकण चौक, मरकळ रोड व प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विशेषतः वडगाव रस्त्यावर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. चाकण चौक आणि प्रदक्षिणा मार्गावरही भाविकांच्या वाहनांमुळे (Alandi Parking Issue) रस्ते अडवले गेले होते. या वाहन कोंडीचे फोटो नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने प्रशासनाची झोप उडाली. त्यानंतर वाहतूक विभागाने तत्काळ कृती करत काही वेळात वाहतूक सुरळीत केली.
या समस्येवर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर म्हणाले, “रस्त्याच्या कडेला दुतर्फा पार्किंग आणि डबल लाईनमुळे वाहतूक खोळंबते. लग्न सराईसाठी असलेल्या धर्मशाळा आणि कार्यालयांची पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.”
नांदुरकर यांनी असेही नमूद केले की, “चाकण चौक येथील सध्याची वाहनतळ व्यवस्था भाविकांसाठी अपुरी आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पलीकडील घाटाजवळ आणि प्रदक्षिणा मार्गावरही वाहनं उभी केली जात आहेत.”
यावर उपाय म्हणून नागरिक, स्थानिक आमदार, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन वाहनतळाची (Alandi Parking Issue) ठोस योजना आखावी, अशी मागणी सोशल मीडियावरून जोर धरत आहे. वडगाव रस्त्यावर वाहनतळ असतानाही फारच थोडी वाहनं तिथे पार्क होतात, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास मरकळ रोडवरील के. के. हॉस्पिटलजवळ वाहने बेशिस्तपणे वळविल्याने बाह्य मार्गावर पुन्हा काही वेळेस वाहतूक कोंडी झाली. दीड ते दोन मिनिटे एक रुग्णवाहिका या कोंडीत अडकली होती. एका सतर्क नागरिकाने तिला वाट मोकळी करून दिली. तत्काळ हस्तक्षेप करत वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
आळंदी शहरातील वाहन पार्किंग (Alandi Parking Issue) व्यवस्थेचा अभाव आणि वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, भाविक, नागरिक आणि आपत्कालीन सेवांचा खोळंबा टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.