Team My Pune City – पुण्यातील कोरेगाव पार्क (Ajit Pawar) येथील तब्बल ४० एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारावरून राज्यात निर्माण झालेल्या वादळानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मैदानात उतरून आपल्या मुलगा पार्थ पवार याची बाजू ठामपणे मांडली आहे. बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “फक्त आकडे देऊन व्यवहार होऊ शकत नाही. चुकीचे काम कोणी केले असेल तर चौकशीनंतर सत्य समोर येईल.”
सरकारकडून चौकशी समिती स्थापन (Ajit Pawar)
या प्रकरणावरून राज्यभरात राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या निर्णयानंतर, अजित पवार यांनी आज प्रथमच विस्तृत प्रतिक्रिया देत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले.
“कागद दाखवून व्यवहार होतो का?” – अजित पवारांचा सवाल
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, “एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा कागद दाखवून व्यवहार होऊ शकतो, हे आजपर्यंत मला समजले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने चुकीची नोंदणी का केली, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल.”त्यांनी पुढे सांगितले की, निवडणुका जवळ आल्या की “आमच्यावर आरोपांची मालिका सुरू होते.”
Today’s Horoscope – Monday : आजचे राशीभविष्य – सोमवार, १० नोव्हेंबर २०२५
“पुरावे नसताना बदनामी केली जाते” (Ajit Pawar)
अजित पवार म्हणाले, “२००९ साली माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला होता. आज १५ वर्ष झाली, पण त्याचे पुरावे कोणी दिले नाहीत. माध्यमांतून आणि काही प्रवक्त्यांकडून पुरावे नसताना आरोप केले जातात. जर चुकीचे काही झाले असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, पण खोट्या गोष्टी पसरवणे योग्य नाही.”
‘पार्थ बोलत नाहीत का?’ – पत्रकारांचा प्रश्न, अजित पवारांचे उत्तर
पत्रकारांनी विचारलेल्या “पार्थ पवार कुठे आहेत आणि ते का बोलत नाहीत?” या प्रश्नावर अजित पवारांनी थेट उत्तर दिले – “त्याच्या बापाने भूमिका मांडली ना…” त्यांनी पुढे हसत म्हटले की, काहींना या प्रकरणावरून राजकारण करायचे आहे, पण सत्य लपवले जाऊ शकत नाही.
बारामती जमीन प्रकरणावरही दिलं स्पष्टीकरण (Ajit Pawar)
बारामतीतील जमीन व्यवहाराबाबत झालेल्या आरोपांवरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. “१९९४ साली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५ एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने केला होता. २००३ मध्ये ती जमीन संघाच्या ताब्यात आली आणि विकासकामांसाठी वापरली गेली. निवडणुका जवळ आल्या की अशी प्रकरणे उकरून आमच्यावर आरोप केले जातात,” असे ते म्हणाले.
सध्या वाद शमल्याचे संकेत
कोरेगाव पार्क प्रकरणावरून गेल्या काही दिवसांत मोठे राजकीय वादळ उठले होते. मात्र चौकशी समिती नेमल्यामुळे आता परिस्थिती काही प्रमाणात शांत झाली आहे. अजित पवार यांच्या थेट प्रतिक्रियेनंतर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर लागलेले आरोप नेमके किती खरे, हे आगामी चौकशीत स्पष्ट होणार आहे.
अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावरील आरोपांपासून बचाव करताना विरोधकांवर पलटवार केला आहे. “आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, पुरावे असतील तर दाखवा,” असे म्हणत त्यांनी या वादावर आपले राजकीय स्थान स्पष्ट केले (Ajit Pawar) आहे.


















