- देशभरात हिंदू संमेलने
Team My pune city –राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक (०४, ०५, ०६ जुलै २०२५) केशव कुंज, दिल्ली येथे नुकतीच पार पडली. त्यानिमित्त केशव कुंज येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बैठकीसंबंधी माहिती दिली. बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
आंबेकर यांनी सांगितले की, प्रांत प्रचारक बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षाच्या योजनेवर चर्चा झाली. शताब्दी वर्षादरम्यान समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून ग्रामीण भागात मंडलस्तरावर आणि शहरी भागात वस्तीस्तरावर हिंदू संमेलनांचे आयोजन केले जाईल. सध्या देशात संघ रचनेनुसार ५८,९६४ मंडले आणि ४४०५५ वस्त्या आहेत. या हिंदू संमेलनांमध्ये समाजातील उत्सव, सामाजिक एकता आणि सलोखा, पंच परिवर्तन या विषयांवर चर्चा होईल. त्याचप्रमाणे, समाजात सलोखा आणि समरसता वाढविण्यासाठी ११,३६० खंड/नगर येथे सामाजिक सलोखा बैठकांचे आयोजन केले जाईल. संघ रचनेनुसार देशातील ९२४ जिल्ह्यांमध्ये प्रमुख नागरिक गोष्ठींचे आयोजन केले जाईल. समूह, व्यवसाय आणि वर्गानुसार होणाऱ्या संगोष्ठींमध्ये भारताचा विचार, भारताचा गौरव, भारताचे स्वत्व या विषयांवर चर्चा होईल.
ते पुढे म्हणाले की, गृह संपर्क अभियानांतर्गत प्रत्येक गाव आणि प्रत्येक वस्तीतील जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. शताब्दी वर्षातील सर्व कार्यक्रमांचा उद्देश व्यापक स्वरुपात भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आणि सर्व कामांमध्ये त्यांचा सहभाग असावा असा आहे. हे अभियान सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी असेल. विजयादशमी उत्सवाने शताब्दी वर्षाचा शुभारंभ होईल. देशभरात आयोजित विजयादशमी उत्सवांमध्ये सर्व स्वयंसेवक सहभागी होतील.
Mahatma Gandhi statue : पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक
ते म्हणाले की, देश पुढे जात आहे, आर्थिक आणि तांत्रिक प्रगती करत आहे. परंतु केवळ आर्थिक किंवा तांत्रिक दृष्ट्या पुढे जाणे पुरेसे नाही. आपल्या समाजाची वैशिष्ट्ये, राष्ट्राचे विशेष गुण, तसेच समाजातील सर्वनागरिकांची काळजी घेणे , पर्यावरण संरक्षण, कुटुंबात जीवन मूल्यांचे रक्षण करणे, सामाजिक जीवनात आपापसात सलोखा राखणे – पंच परिवर्तनाचे हे विषय समाजापर्यंत पोहोचवले जातील. या संदेशाला शताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात घेऊन जाणार आहोत. जर समाज यावर विचार करेल आणि त्यात सहभागी होईल, तर आपली ही प्रगती एकतर्फी नसेल, तर ती सर्वसमावेशक असेल आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल.
त्यांनी सांगितले की, तीन दिवसीय प्रांत प्रचारक बैठकीत संघ कार्य विस्तार, शताब्दी वर्ष योजना, विविध प्रांतांमध्ये सुरू असलेली कामे, अनुभव आणि प्रयत्नांवर चर्चा झाली. तसेच, समाज जीवनातील विविध समकालीन विषयांवरही चर्चा झाली. बैठकीत मणिपूरमधील सद्यस्थिती, स्वयंसेवकांनी केलेली कामे आणि सामाजिक सलोख्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरही चर्चा झाली. स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत, स्वयंसेवक दोन्ही पक्षांशी बोलत आहेत. सीमावर्ती प्रांतांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी तेथील कार्याची स्थिती आणि अनुभवांबद्दल सांगितले. संघ कार्यकर्ते समाजासोबत मिळून स्थानिक नागरिकांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.
Python : कोंबड्यांच्या खुराड्यात आढळला भला मोठा अजगर
प्रशिक्षण वर्ग
सुनीलजींनी सांगितले की, एप्रिल ते जून या काळात देशभरात १०० प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित ७५ वर्गांमध्ये १७,६०९ स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले. त्याचप्रमाणे, ४० ते ६० वयोगटातील स्वयंसेवकांसाठी आयोजित २५ वर्गांमध्ये ४,२७० प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. या प्रशिक्षण वर्गांमध्ये देशातील ८,८१२ ठिकाणांहून स्वयंसेवकांचा सहभाग होता.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, लोभ, जबरदस्ती, परिस्थितीचा गैरफायदा घेणे आणि षड्यंत्र रचून धर्मांतर करणे चुकीचे आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, भारतातील सर्व भाषा राष्ट्रभाषा आहेत आणि संघाचे मत आहे की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. या प्रसंगी दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल, अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर आणि प्रदीप जोशी उपस्थित होते.