Team My Pune City –घर व परिसरामध्ये साफसफाई न ठेवल्याने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते. शहरातील अशा घरांची तपासणी करण्यात आली असून तब्बल ५ हजार १७२ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. अळ्या सापडलेल्या घरमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत सात लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पंक्चर दुकाने, बांधकाम ठिकाणे तपासण्यासाठी पथक तयार केले असून दररोज तपासणी केली जाणार आहे.
पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य विभाग ‘अलर्ट’ झाला असून शहरात डेंग्यू डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये घर, परिसर, जुनी व नवीन बांधकामे तसेच पंक्चर व टायरची दुकाने तपासण्यात येत आहे. पथकाच्या वतीने गेल्या महिन्याभरामध्ये २ लाख ७७ हजार ८८५घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५१७२ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तर ७१७ टायर व पंक्चरच्या दुकानाची तपासणी करण्यात आली. शहरामध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहे. याठिकाणी पाणी साचत असल्याने साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्यांची पैदास झपाट्याने होते. पथकाच्या वतीने अशा ९८० बांधकामांचीही तपासणी करण्यात आली. तसेच यापुढे या बांधकामांची नित्यनेमाने तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा मालकांची संख्या २५२ असून त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ज्या नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता ठेवलेली नाही अशा २ हजार १९६ मालकांना नोटीस देण्यात आली आहे.