Team My Pune city- पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (१ जून) दुपारी १.५५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भट्टी आळी, बावधन बुद्रुक येथील श्रीराम निवास इमारत हा प्रकार घडला.
प्रकाश नागनाथ जाधव (४३, बावधन बुद्रुक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रविण प्रकाश जाधव (१८) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेव्हा बेडरूममध्ये गेले, तेव्हा त्यांच्या आईला बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. तिच्या गळ्यावर लालसर व्रण दिसले. वडील घटनास्थळावरून अॅम्ब्युलन्स आणण्याच्या बहाण्याने निघून गेले. त्यामुळे खून झाल्याचा संशय निर्माण झाला. फिर्यादी यांची आई आणि वडील यांच्यात सतत वाद होत होते. वडील प्रकाश जाधव याची नोकरी गेली होती. त्यामुळे घरात आर्थिक अडचण निर्माण झाली होती. तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून फिर्यादीच्या आई-वडिलांमध्ये सतत भांडण होत होते. या कारणावरून वडील प्रकाश याने आईचा खून केल्याचे प्रवीण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
इन्शुरन्सच्या नावाखाली ९२ हजारांची फसवणूक
एका ६३ वर्षीय महिलेला इन्शुरन्सच्या नावाखाली ९२ हजार रुपयांना गंडविण्यात आले. ही फसवणूक ६ मे ते ७ मे दरम्यान निगडीतील प्राधिकरण परिसरात घडली.
राहूल पांडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्राधिकरण, निगडी येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमची मॅक्सलाईफ इन्शुरन्स कंपनीत असलेली पॉलिसी लॅप्स होणार असल्याचे सांगत आरोपीने फिर्यादी यांच्याकडून फोन पेवरून ९२ हजार रुपये घेतले. त्या पैशाची पावती न देता, तसेच फोन बंद करून फसवणूक केली.
वाहन भाड्याने देण्याच्या बहाण्याने १ कोटींची फसवणूक
चारचाकी वाहने भाड्याने देण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान आकुर्डी येथे घडला आहे.
मानीश अशोकभाई हरसोरा (३९, आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एक ५० वर्षीय नागरिकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानीश याने फिर्यादी यांच्यासह इतर ९ जणांकडून ११ वाहने भाडेतत्वावर देण्यासासाठी करारनामा करून घेतली. ती वाहने गुजरात येथे नेली. वाहने भाडेतत्वावर न लावता, वाहनांचे ११ लाख ६८ हजार रुपयांचे भाडे न देता, तसेच ९० लाख रुपये किंमतीची ११ वाहने देखील परत न देता सर्वांची एक कोटी एक लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली.
हिंजवडीतील सोसायटीत जातीवाचक शिवीगाळ
व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनुसूचित जातीतील व्यक्तीविषयी जातिवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जुलै रोजी हिंजवडी येथे घडली.
सौरव अशोककुमार सुमन (३८, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रमेश दिलीप आहीरे (३७, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी आणि आरोपी यांच्यात वाद झाला. त्यानंतर या संवादाचा तपशील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आला. या ग्रुपवरून आरोपीने फिर्यादी अनुसूचित जातीचे आहेत, हे दर्शवण्याच्या उद्देशाने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली. या कृतीमुळे फिर्यादी यांचा समाजात अपमान झाला. त्याचप्रमाणे, आरोपीने “रूमवर येऊन पाहून घेतो” अशी धमकीही फिर्यादीला दिली. या प्रकारामुळे फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकडमधील रात्रपाळीतील सिक्युरिटी गार्डवर पाच जणांचा हल्ला
वाकड येथील पार्क स्ट्रिट सोसायटीच्या मुख्य गेटजवळ पाच अनोळखी व्यक्तींनी मध्यरात्री सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काठीने हल्ला करत मारहाण केली. यामध्ये सोसायटीचा कॅमेरा फोडण्यात आला असून, खुर्च्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान घडली.
परमेश्वर मळसिद्ध म्हस्के (५०, वाकड, मूळगाव हांजगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी, वॉचमन सुनील पाटील आणि बाऊंसर शेखर जांभळे हे ग्लेनहॉक सिक्युरिटी एजन्सीमार्फत ड्युटीवर होते. त्यावेळी पाच अनोळखी व्यक्तींची तेथे येऊन, “उद्या पुन्हा येथे ड्युटीला आलात, तर खल्लास करून टाकू,” अशा शब्दांत धमकी दिली. त्यापैकी एकाने लाकडी काठीने सोसायटीचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडला, तर उर्वरित दोघांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली. याच दरम्यान, रस्त्याजवळ थांबलेल्या इतर दोन इसमांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली आणि चार-पाच प्लास्टिकच्या खुर्च्याही फोडून नुकसान केले. या हल्ल्यामुळे सोसायटी परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
…………………………
आळंदीत वाहन उलटून वृद्ध महिलेला मृत्यू
रस्त्यावर भरधाव वेगात चालवलेली चारचाकी पलटी होऊन झालेल्या अपघातात ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. हा अपघात आळंदीतील तनिष्क सृष्टी सोसायटीजवळ मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडला.
गिरिजादेवी राधेश्याम रावत (६३) असे अपघातात मृत्यूमृखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सत्यप्रकाश राधेश्याम गुप्ता (६३, जयपूर, राजस्थान) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर राम जाधव (३१) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी, त्यांचे नातेवाईक आणि वृद्ध महिला गिरिजादेवी रावत हे चारचाकी वाहनातून प्रवास करत होते. दरम्यान, आरोपीने आपले वाहन हयगयीने आणि अविचाराने चालवल्यामुळे ते रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात गिरिजादेवी गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडल्या, तर अन्य प्रवासी आणि चालकही जखमी झाले.