Team MyPuneCity –पुणेकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरावी अशी घोषणा आज झाली असून, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तार प्रकल्पाला केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन नवीन उन्नत मार्ग या टप्प्यात उभारले जाणार आहेत. यामुळे वनाज–रामवाडी या विद्यमान मार्गाचे प्रभावी विस्तारीकरण होणार असून, पुण्याच्या पश्चिम भागातील बावधन–कोथरूड आणि पूर्व भागातील खराडी–वाघोली हे भाग मेट्रोशी जोडले जाणार आहेत.
Pimpri Chinchwad: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
१२.७५ किमी लांबी, १३ नवीन स्थानकं
या नव्या मेट्रो विस्तारामध्ये एकूण १२.७५ किमी लांबीचे दोन मार्ग असून त्यावर १३ स्थानकांची योजना आहे. या स्थानकांद्वारे IT हब्स, शैक्षणिक संस्था, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रे आणि रहिवासी वसाहती एकमेकांशी थेट जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे लाखो पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहे.
वाघोली व चांदणी चौक या टोकांवर मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी
हे नवीन मार्ग *जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहेत. तसेच, *चांदणी चौक आणि वाघोली* येथे आंतरशहर बससेवेला मेट्रोशी जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांतून येणाऱ्या प्रवाशांनाही थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
₹३,६२६.२४ कोटींचा प्रकल्प, ४ वर्षांत पूर्णता
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ₹३,६२६.२४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या संपूर्ण कामांची अंमलबजावणी महा-मेट्रो (MahaMetro) कडून केली जाणार असून, येत्या चार वर्षांत हे विस्तारीकरण पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची घेतली होती भेट
या मंजुरीसाठी काही दिवसांपूर्वी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर सादरीकरण केले होते. या पाठपुराव्याच्या परिणामी आज केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
“पुणे शहराच्या गतिमान, सुसंगत आणि शाश्वत वाहतुकीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. माझ्या पाठपुराव्याला केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पुणेकरांच्या स्वप्नांना आता गती मिळणार आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे पुणेकरांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो.” – मुरलीधर मोहोळ, खासदार व केंद्रीय राज्यमंत्री

पुणेच्या ‘स्मार्ट सिटी’ स्वप्नाला मिळणार बळ
या निर्णयामुळे पुण्याचा स्मार्ट आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क अधिक भक्कम होणार असून, शहरातील वाहतूककोंडी, प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, पुण्याचा ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ व्हिजन आता आणखी साकार रूप धारण करत आहे.