Team MyPuneCity –बनावट ई-मेल आयडी तयार करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत बाणेर येथे घडली.
सूदर्शन श्रीकांत लाठकर (वय ३३, रा. बाणेर) यांनी शनिवारी (दि. २१) याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिरूमलशेट्टी व्यंकटेश्वर राव उर्फ टी. व्ही. राव व तिरूमलाशेट्टी राघव (रा. आंध्रप्रदेश) यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून ICICI सिक्युरिटीज या नामांकित संस्थेच्या नावाने service@icicidirect.online, inspection@icicidirect.online, adjudication@icicidirect.online हे बनावट ई-मेल आयडी तयार केले. या ई-मेलवरून बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवून टाटा मोटर्स शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे भासवून सुरुवातीला काही प्रमाणात परतावा दिला. नंतर लाठकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपये घेतले. त्यापैकी ९९ लाखांचा परतावा करून उर्वरित सुमारे ३.९८ कोटी रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक केली.
चिंचवडमध्ये महिलेला तिघांकडून मारहाण
पतीला चुकीची माहिती सांगितल्याच्या रागातून केशवनगर, चिंचवड येथे एका महिलेस तिघांनी मिळून शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २१) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मारहाण झालेल्या एका पिडित महिलेने शनिवारी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिलांसह विजय भगवान जाधव (तिघेही रा. पागेची तालीम, केशवनगर, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरासमोर उभ्या असलेल्या पीडितेला विजय जाधव आणि दोन महिला आरोपींनी उद्देशून शिवीगाळ केली. यामध्ये एका महिलेसोबतच्या आरोपीने पीडितेचे डोके धरून मारहाण केली, दुसऱ्या महिलेने हात पकडले आणि विजय जाधवने दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर आदित्य हॉटेलजवळ घडली.
सतीश मिलिंद गंगावणे (वय ३२, रा. बहुळ, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचे चुलत भाऊ सोहन रवींद्र गंगावणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश हे रस्त्याने पायी चालत असताना अंधाराचा फायदा घेऊन भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना पुनावळे अंडरपासजवळ ९ जून रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली.
सचिन पांडूरंग लोहार (वय ४५) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नीने शनिवारी (दि. २१) याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत सुभाष ढगे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लोहार हे आपल्या युनिकॉर्न दुचाकीवरून जात असताना, हेमंत डगे (रा. भोसरी) याने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये लोहार यांच्या नाक, डोळा, गुडघा इत्यादी ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या दुचाकीचे नुकसानही झाले आहे.
पिंपरीत गांजासह तरुण अटकेत
पिंपरीतील तपोवन मंदिर रोड परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री करताना एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस शिपाई संतोष बिभषण सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योहान अरुण आंब्रे (वय १९, रा. वाघेरे चाळ, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंब्रे याच्याकडून नऊ हजार ७०० रुपयांचा १९४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा गांजाची विक्री करण्यासाठी त्या परिसरात थांबलेला होता. या प्रकरणी पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
मोशी येथे देशी दारू साठा जप्त
विनापरवाना देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोशी येथील गणेशनगर भागात शनिवारी (दि. २१) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अनिल आप्पराव भुंबे (वय ३९, रा. शिवाजीवाडी मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार चंद्रकांत गोरख जाधव यांनी शनिवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भुंबे याच्या ताब्यातून तीन हजार २२० रुपये किंमतीच्या ४६ बाटल्या पॉवर लाईम पंच देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या. आरोपीने हा साठा माई हॉटेल शेजारी मोकळ्या मैदानात विक्रीसाठी ठेवला होता. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
जुगार प्रकरणी महिलेवर गुन्हा
एका महिलेविरुद्ध सॉरेट जुगार चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली परिसरातील विसावा चौकाजवळ शनिवारी (दि. २१) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलीस शिपाई संतोष भोर यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चक्रपाणी वसाहत येथे राहणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार आरोपी महिला रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बॅनवर नागरिकांकडून पैसे घेऊन सॉरेट जुगार खेळवताना आढळली. घटनास्थळी एक हजार ६० रुपयांचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.