Team MyPuneCity – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा काल रात्री माऊली माऊलींच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडला. आळंदी नगरीतून लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्रींची पालखी (Mauli Palkhi) पुण्याकडे निघाली असून, अवघी वारी भक्तिरसात न्हालेली आहे.
काल दिनांक १९ जून रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा करून पालखीने महाद्वारातून बाहेर पडत भरावरस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वार चौक असा मार्ग घेत ‘दर्शन मंडप’ अर्थात ‘आजोळ घरी’ मुक्काम केला.
Dehu : तुकाराम महाराजांच्या पालखीचा भक्तिरसात न्हालेला वैष्णवांचा मेळा; देहूतून पालखीचे प्रस्थान
आज सकाळी दिनांक २० जून रोजी पावणे सातच्या सुमारास माऊलींच्या अश्वांनी श्रींच्या पालखीचे (Mauli Palkhi) दर्शन घेतले. त्यानंतर खांद्यावर खांद्यावर पालखी पालिका चौकापर्यंत आणण्यात आली. सव्वा सातच्या सुमारास रथात विराजमान झालेल्या पालखीने माऊली माऊलींच्या गगनभेदी जयघोषात पुण्याकडे प्रस्थान केले.

खांद्यावर पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांची दिंडी, टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अभंग, विठ्ठलनामाचा गजर यामध्ये दिंड्या भक्तिभावाने सहभागी झाल्या. संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हालेला दिसत होता. पालिका चौकात नगरपरिषदेच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदा माऊलींच्या रथास विवेक घुंडरे आणि अर्जुनराव घुंडरे यांच्या बैलजोडीचा मान लाभला आहे.
Alandi : माऊली…. माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान
या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी (Mauli Palkhi) देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माऊलींचे मानकरी योगीराज कु-हाडे, राहुल चिताळकर पाटील, योगेश आरू, चोपदार रंधवे आळंदीकर तसेच स्थानिक ग्रामस्थ व असंख्य वारकरी भाविक उपस्थित होते.
वारकरी दिंड्या सुसंघटित पद्धतीने मार्गक्रमण करत असून संपूर्ण आळंदी भक्तिसागरात चिंब भिजलेली दिसत आहे. आता माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम, पुढील स्वागत व सोहळ्यांची उत्सुकता वाढली आहे.