Team MyPuneCity – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई खेड तालुक्यातील निघोजे ( Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025)येथे मंगळवारी (17 जून) सायंकाळी करण्यात आली.
शुभम सोमेश्वर मुंगडे (20, कडाचीवाडी खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामदास मेरगळ यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे येथे एआरएआय चौकामध्ये एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शुभम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गुंतवणूकीच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025)
ब्लिंक्स प्रो ट्रेडिंग अॅपच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंटचे आमिष देत सुमारे १५ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडली.
रिची आणि निनाद ( पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत वाकड येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २९ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल ते २ मे २०२५ दरम्यान, आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून फिर्यादीशी संपर्क साधून ब्लिंक्स प्रो ट्रेडिंग अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून १४ लाख ९३ हजार ५०० रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करून घेत कोणताही परतावा न देता फसवणूक केली.
Bopkhel Murder : महिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खून
तोडफोड करण्यास मनाई केल्याने मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025)
नातेवाईकाच्या टेम्पोची तोडफोड करताना अडविल्याच्या कारणावरून दोन भावांनी एका तरुणास मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (16 जून) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अजंठानगर, निगडी येथे घडली.
जीवन पोटभरे आणि आदर्श पोटभरे (दोघेही रा. अजंठानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मयूर सुनील क्षेत्रे (२८, अंजठानगर, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी रात्री फिर्यादी हे शौचालयासाठी गेले असता, आरोपी जीवन हा फिर्यादी यांचे नातेवाईक पप्पू सदाफुले यांच्या टेम्पोचे नुकसान करीत होता. याबाबत फिर्यादी यांना त्यास तसे करण्यास मनाई केली. या कारणावरून आरोपी जीवन याने फिर्यादीच्या डाव्या कानावर व मानेवर टणक वस्तूने मारहाण केली. तसेच आरोपी आदर्श याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
टेम्पोची रिक्षाला धडक; चालक गंभीर जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025)
टेम्पोने धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. ही घटना सोमवारी (१६ जून) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वाकडमधील भूमकर चौकाजवळ घडली.
पोलिसांनी अज्ञात टेम्पोवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळु बंडु गिरी (३०, पिंपळे गुरव) असे अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सकाळी आठ वाजता फिर्यादी हे रिक्षा चालवित असताना टेम्पोने नियमांचे उल्लंघन करून धडक दिली. फिर्यादीच्या पायाला फ्रॅक्चर झाला व प्रवासी महिला किरकोळ जखमी झाल्या.
Shirgaon Crime News : शिरगाव येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
हॉटेलमध्ये इलेक्ट्रीक शॉकने कामगार महिलेचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025)
हॉटेलमध्ये इलेक्ट्रीक शॉक लागून महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना दत्तनगर, चिंचवड येथे ४ जून रोजी घडली.
दीपाली निनु जाधव (३०) असे शाॅक लागून मृत्यूमुखी पडलेल्या कामगार महिलेचे नाव आहे. याबाबत तिचे पती निनु नथुराम जाधव (३८, दत्तनगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (१७ जून) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव मोरे (फुलेनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी दिपाली जाधव या दत्तनगर, चिंचवड येथील हॉटेल मोरे व्हेज नॉनव्हेज चायनीज सेंटर येथे ४ जून रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास भांडी धुत असताना शॉक लागून मृत्यूमुखी पडल्या. घटनास्थळी पाणी साचलेले होते व सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. त्यामुळे हॉटेल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.