Team MyPuneCity –डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारात गुंतवणूक आणि डेटिंग ऍपवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या तीन गुन्ह्यात तब्बल २.११ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यातील १० आरोपींना सायबर पोलिसांनी दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे विमानतळ येथून अटक करण्यात आली आहे.
Kalyani Deshpande: गांजा विक्रीचे रॅकेट चालवणारी मास्टरमाइंड कल्याणी देशपांडे हिला आंध्र प्रदेश मधून अटक;अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, चौघांना अटक
पिंपरी-चिंचवड मधील एका व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये आयपीओ खरेदीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून ३.३० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या गुन्ह्यातील २.१० लाख रुपये सिल्वासा, दादरा व नगर हवेली येथील एका बँक खात्यावर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दादरा व नगर हवेली येथून सलमान रफिक खान (३२), बंटी रमेशभाई पांचाळ (३०), इंतकाफ इद्रीस खान (३६), सुरज कृष्णा सिंग (३४, दादरा व नगर हवेली) यांना अटक केली.
१.५५ कोटींची फसवणूक करून नेपाळ येथे पलायन करणाऱ्या तिघांना अटक
डेटिंग ऍपवर लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेकडून एक कोटी ५५ लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेण्यासाठी आरोपींनी घर खरेदी, ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक अशी कारणे सांगितली. या गुन्ह्यासाठी वापरलेले बँक खाते सोलापूर येथील असल्याचे समजल्याने सायबर पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन एमीत एकबोटे याच्याकडे चौकशी केली. अमित याचे बँक खाते गेमिंगसाठी वापरले जाणार असल्याचे तिघांनी सांगितले होते. त्यांची माहिती घेत पोलिसांनी शुभम चंद्रकांत मंथा (२५), स्वप्नील चंदुलाल बाहेती (३५), प्रशिक उत्तम नवघरे (२६, सोलापूर) यांना अटक केली आहे. हे तिघेजण पटना मार्गे नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी स्वप्नील आणि शुभम हे चीन येथील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत. तर शुभम हा चीन मधील एका कंपनीत काम करत आहे.
डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ५२.५९ लाखांची फसवणूक, तिघांना अटक
डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एका व्यक्तीला ५२ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अहिल्यानगर येथून अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता फरार आरोपी विशाल पालवे हा लोकांकडून बँक खात्याचे डिटेल्स घेऊन त्यावर सायबर फसवणुकीतील पैसे घेत होता. ते पैसे तो सीडीएम द्वारे इतर आरोपींना पाठवून ते क्रिप्टो वॉलेटला युएसडीटी मध्ये रूपांतरण करून घेत होता. त्यानुसार पोलिसांनी विशाल याची माहिती काढून त्याला अटक केली. त्याच्याकडून नऊ मोबाईल फोन, २३ बँक खात्याचे पासबुक, १८ बँक खात्यांचे चेकबुक, ३५ डेबिट कार्ड, ६४०० रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यासह अक्षय सदाशिव गळवे आणि मयूर सुनील आनेचा यांनाही अटक करण्यात आली. आरोपी आपली ओळख लपविण्यासाठी डिसेंट्रलाइज्ड वॉलेटचा वापर करत होते. तसेच ते फसवणुकीची रक्कम क्रिप्टो करन्सीद्वारे पुन्हा बाजारात आणत होते.