Team MyPuneCity – हिंजवडी मधील भाटेवरानगर येथील हॉटेल ठेका मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या ( Pimpri Chichwad Crime News 17 June 2025) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाई मध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (१६ जून) पहाटे करण्यात आली.
पवन बाळासाहेब उदार (२०, हिंजवडी), सोहम दीपक कदम (२३, वाकड), करण नरकांत जयसी (२३, हिंजवडी) आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह वैभव वारडे आणि राजेंद्र विनोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटेवरानगर येथे वैभव वारडे याचे हॉटेल ठेका आहे. हॉटेल मध्ये आरोपी महिला मॅनेजर म्हणून काम करत होती. तर सोहम कदम हा हॉटेल चालवत होता. पवन उदार हा हुक्का बनविण्याचे काम करत होता. आरोपींनी संगनमताने हॉटेल मध्ये हुक्का पार्लर सुरु केले. त्यामध्ये नागरिकांना शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य हुक्का विक्री केला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करत चौघांना अटक केली. करण जयसी हा मूळचा नेपाळ येथील रहिवासी असून तो हुक्का पार्लरसाठी कोल पुरविण्याचे काम करत होता. पोलिसांनी १४ हजार ८४७ रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
Polytechnic : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 17 June 2025)
रस्त्यात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (१५ जून) रात्री खराबवाडी येथे घडली.
अमोल शिवाजी उचाडे (२८, चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश दिलीप खराबी, अक्षय दिलीप खराबी, शेखर राक्षे (चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल हे निघोजे येथून खराबवाडी येथे पायी चालत जात होते. खराबवाडी येथील चांदणी चौकात बाबू राजगुरू आणि आकाश राजगुरू यांना आरोपी मारहाण करत होते. हे भांडण सोडविण्यासाठी अमोल गेले असता आरोपींनी अमोल यांना मारहाण करून जखमी केले. तसेच बाबू आणि आकाश राजगुरू यांना देखील मारहाण केली.
रागाने बघितल्याच्या संशयावरून ट्रक चालकास मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 17 June 2025)
रागाने बघितल्याच्या संशयावरून चौघांनी एका ट्रक चालकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (१५ जून) पहाटे बावधन येथे घडली.
अमोल रामदास बांदल (४६, फुरसुंगी, पुणे) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील सुरेश सोनावणे, अतुल तोंडे, अविनाश तोंडे, नरेश ऐनपुरे (नर्हे पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बांदल हे ट्रक चालक आहेत. ते शनिवारी रात्री पुणे येथून मुंबईच्या दिशेने ट्रक घेऊन जात होते. बावधन येथे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला पार्क केला आणि रात्री तिथेच झोपले. रविवारी पहाटे उठून जात असताना आरोपी तिथे आले. त्यांनी अमोल यांना त्यांच्याकडे रागाने बघितल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.
Takve : टाकवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 17 June 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला घरातून बाहेर बोलावून घेत मारहाण केली. तरुणाच्या डोक्यात दारूची बाटली मारल्याने तरुण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (१५ जून) रात्री बौध्दनगर, पिंपरी येथे घडली.
सिद्धार्थ हिरामण गालफाडे (२०), यश गायकवाड (१८, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी तरुणाच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी सिद्धार्थ आणि यश हे फिर्यादी यांच्या घरासमोर आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून बाहेर बोलावून घेतले. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला दारूच्या बाटलीने मारून जखमी केले.
सिमेंटच्या गट्टूने मारत तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न ( Pimpri Chichwad Crime News 17 June 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी (१५ जून) रात्री भारत नगर, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
राहुलसिंग रमेशसिंग टाक (१९, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सोहेल शब्बीर कुरेशी (२०, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुरेशी यांचे आरोपी राहुलसिंग याच्यासोबत चार महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाच्या कारणावरून रविवारी राहुलसिंग याने कुरेशी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सिमेंटच्या गट्टूने वारंवार डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला.