Team MyPuneCity – देशातील अत्यंत कुख्यात आणि दहशत निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे (Lawrence Bishnoi) नुसते नाव ऐकले तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. अशा गुन्हेगारी जगतातील डॉनचा प्रचार करणारी एक कार पुण्यात मोकाट फिरताना आढळून आली असून तिच्यावर स्पष्टपणे ‘लॉरेन्स बिश्नोई समर्थक’ असे मराठीत लिहिलेले होते.
ही घटना शुक्रवारी (१४ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. खडकी रेल्वे स्थानकाच्या शेजारील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून ही गाडी पुण्याकडे जात होती. विशेष बाब म्हणजे – या घटनेचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केला, आणि तो पाहता पाहता व्हायरल झाला. नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाढली आहेत.
‘समर्थक’ असलेल्या गाडीचा दहशतीसाठी फेरफटका?
गाडीच्या मागील काचेवर मोठ्या आणि उठावदार मराठी अक्षरात ‘लॉरेन्स बिश्नोई समर्थक’ (Lawrence Bishnoi) असे लिहिण्यात आले होते. ही केवळ ‘स्टाइल स्टेटमेंट’ की गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित गंभीर इशारा, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.या प्रकारामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, गुन्हेगारी टोळ्यांचे गौरव करणारी मानसिकता पुण्यासारख्या शहरात रुजते आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांची अनास्था की दुर्लक्ष?
घटना घडली ती जागा पोलीस गस्त व वाहतूक नियंत्रणासाठी संवेदनशील मानली जाते. तरीदेखील अशी गाडी खुल्या रस्त्यावरून गेली, आणि ती पोलिसांच्या लक्षात आली नाही की ती मुद्दाम दुर्लक्ष केली गेली, असा सवाल सोशल मीडियावरून आणि नागरिकांमधून विचारला जात आहे.अद्याप या घटनेवर पुणे पोलिसांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे.
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत –
“गुन्हेगारी टोळ्यांचे समर्थक असे लिहून कोणी मोकळेपणाने (Lawrence Bishnoi) फिरतो आणि पोलिसांना कळतच नाही?” “हे काय पुणे आहे की पंजाब-मराठवाडा दहशत गल्ली?” अशा संतप्त प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत.
Alandi : मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान
अशा घटनांमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहतात. पोलिसांनी संबंधित गाडी आणि चालकाचा शोध घेऊन त्याच्या हेतूबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. हे केवळ स्टंटबाजी असेल, तरीही अशा कृतींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, कारण यामधून पुढील गुन्हेगारी मानसिकता तयार होऊ शकते.
या घटनेमुळे ‘गँगस्टर ग्लॅमर’चा (Lawrence Bishnoi) प्रकार पुण्यात नव्याने डोके वर काढतोय का? आणि पोलिस यंत्रणा त्याला वेळेत रोखू शकेल का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.