Team MyPuneCity – नारायण पेठ येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय इसमाला डेटिंग अॅपवरून फसवून, त्याच्याकडील मोबाईल व ६० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. जुना बाजार, मंगळवार पेठ येथे दि. ९ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी मोबाईलवर व्हाला अॅपचा वापर करून डेटिंगसाठी चॅटिंग करत होते. याच दरम्यान आरोपी वाहिद रज्जाक शेख (वय १९, रा. जुना बाजार रेल्वे भराव, मंगळवार पेठ) आणि अन्य दोन अनोळखी इसमांशी ओळख झाली. त्यांनी फिर्यादीस प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले. मात्र भेटीच्या वेळी त्यांनी त्याला हत्याराचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला आणि मारहाण केली.
मोबाईलमधून फोन पे अॅपचा पासवर्ड विचारून त्याच्या खात्यातून ६० हजार रुपये जबरदस्तीने काढले. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक झाली आहे.
पोलीस असल्याची बतावणी करत ६.२४ लाखांचे दागिने लांबवले
वारजे माळवाडी येथे ६४ वर्षांच्या महिलेला पोलीस असल्याचे भासवत तिच्याकडील ६ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले आहेत. १० जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अविस्मरा हॉलच्या गेटजवळ ही घटना घडली.
दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी महिलेला “येथे खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत. तुम्ही अंगावरील दागिने बॅगेत ठेवा” असे सांगून गंडा घातला. त्यांनी बघताबघता हातचलाखीने दागिने पळवले. वारजे माळवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Talegaon Dabhade : डॉ.अपर्णा महाजन यांची अ.भा.म. नाट्यपरिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड
लग्नाचे आमिष दाखवून ८.३५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
येरवडा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला डिव्होर्स मॅट्रिमोनी साईटवरून ओळख करून घेऊन, लग्नाचे आमिष दाखवत ८ लाख ३५ हजार ७६५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०२५ ते २ जून २०२५ दरम्यान ही घटना घडली.
सदर मोबाईल धारकाने आपण पुण्यात येत असल्याचे सांगून, “माझ्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केस आहे, दिल्ली आणि पुणे विमानतळावर अडवलं आहे” अशा बहाण्याने पैसे उकळले. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप अटकेत नाही.
Pimpri: अक्षय कुलकर्णी यांना जर्मनी मधील आयरमॅन किताब
थेऊर येथून तांब्याच्या तारांचे ३ लाखांचे बंडल चोरी
थेऊर परिसरात पार्क केलेल्या टेम्पोमधून ३ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचे बंडल चोरण्यात आले. ६ जून रात्री ११ ते ७ जून सकाळी ६.३० दरम्यान जय मल्हार हॉटेलजवळील रस्त्यावर ही चोरी झाली.
सुरज शाम जाधव (वय १९), यश अजित सावंत (वय २१), महेश बसवराज पुजारी (वय २२, सर्व रा. थेऊर) या तिघांना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे.
चालत्या मोटारसायकलवरील तिघांकडून अल्पवयीन मुलाचा मोबाईल हिसकावला
औंध रस्त्यावर पहाटे वॉकला गेलेल्या १७ वर्षीय मुलाकडून तीन अनोळखी इसमांनी मोबाईल हिसकावून नेला. ही घटना ९ जून रोजी पहाटे ४.५५ च्या सुमारास घडली.
खडकी रेंजहिल्स परिसरात चालत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याला हत्याराचा धाक दाखवून २० हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. खडकी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षातून जाताना १.७० लाखांची सोनसाखळी हिसकावली
हडपसर गाडीतळाजवळ रात्रीच्या वेळी एका ३५ वर्षीय इसमाकडून सोनसाखळी हिसकावण्यात आली. ८ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी रिक्षातून प्रवास करत असताना, अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १ लाख ७० हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बसमधील गर्दीचा फायदा घेत ४५ हजारांची बांगडी चोरी
कोथरुड परिसरात एसपी कॉलेज ते वानाज कॉर्नर दरम्यान पीएमटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या ७२ वर्षीय वृद्धेची ४५ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरीस गेली.
९ जून रोजी पहाटे १.३० वाजता बसच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने ही चोरी केली. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४७ लाखांची फसवणूक
कोथरुड येथील ४१ वर्षीय महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल ४७ लाख ६८ हजार २८८ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
२७ फेब्रुवारी ते २२ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून मोबाईल धारक व बँक खातेधारक व्यक्तींनी हा प्रकार केला. कोथरुड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.