पिंपरी चिंचवड सायबर पोलीसांची दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर सुसूत्र कारवाई
Team MyPuneCity – शादी डॉट कॉम या मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन महिलेशी ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन कोटी १६ लाख ७८ हजार ११३ रुपये इतकी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तीन आरोपींना दिल्ली-हरियाणा बॉर्डरवरून अटक केली आहे.
रणजित मुन्नालाल यादव (वय 27), सिकंदर मुन्ना खान (वय 21), बबलु रघुवीर यादव (वय 25, तिघेही रा. मंडी गाव, जॉनपूर, दक्षिण दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेशी शादी डॉट कॉम या मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन आरोपींनी संपर्क साधला होता. आरोपीने आपण एका मोठ्या कंपनीत सीइओ असल्याचे सांगितले. विविध कारणे सांगून त्याने १० जुलै २०२३ ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादीकडून ८१ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तीन कोटी १६ लाख रुपये वसूल घेतले. पैसे घेतल्यावर आरोपी गायब झाले आणि व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम कॉलचा वापर करून पोलीसांना गुंगारा देऊ लागले. आरोपींनी एकाच पत्त्यावर ११ बँक खाती उघडून, त्यातून पैसे वेगवेगळ्या ३०० ते ४०० खात्यांत ट्रान्सफर केले होते.
रणजित यादवने स्वत:च्या खात्यावर ३६ लाख ९६ हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. बबलु यादवने वेगवेगळ्या एटीएममधून रक्कम काढून मुख्य आरोपीकडे सुपूर्त केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदिप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केला आहे.
मेट्रोमोनिअल वेबसाईटवरून ओळख झालेल्या परदेशी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्यांची खातरजमा करावी. तसेच अशा माध्यमातून पैशांची मागणी केल्यास तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
- डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त