Team MyPuneCity – भरधाव वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीस पाठीमागून धडक दिली , मध्ये दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. सदरचा अपघात भांबोली ( ता.खेड ) गावाच्या हद्दीत मंगळवारी 10 जून 2025 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
गणेश बाळू जाधव ( वय २७ रा.कुरकुंडी,ता.खेड) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण एमआयडीसी भागात गणेश जाधव हा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करीत होता. या प्रकरणी गोरक्षनाथ काळूराम घावटे (वय -३०,रा.भांबोली ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून डंपर चालक कानिफनाथ दिगंबर बोंबले ( वय 34 मूळ राहणार उमरखेड जि, यवतमाळ , सध्या . आंबेठाण , ता.खेड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांबोली गावच्या हद्दीत हॉटेल मोनिका समोर चाकण ते वांद्रा रस्त्यावर कानिफनाथ बोंबले हा त्याच्या ताब्यातील टाटा डंपर भरधाव वेगात वराळे बाजू कडून वासुली गाव बाजूकडे चालवत घेऊन जात होता. त्यावेळी भांबोली येथे दुचाकीस पाठीमागून धडक देऊन अपघात केला. अपघातात मोटर सायकल स्वार गणेश बाळू जाधव यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.