Team MyPuneCity : नव्या पिढीला शिवकालीन युद्धकलेची माहिती मिळावी या उद्देशाने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नुकतेच आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीमध्ये शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
१५ दिवस चाललेल्या या शिबिरात ८ वर्षांपुढील ६४ जणांनी सहभाग घेत या युद्धकलांची माहिती घेतली. या सर्वांना नुकतेच प्रशस्तीपत्रक देत त्यांचे कौतुक करण्यात आले. शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद साळुंखे, सिव्हील इंजिनीअर विलास कोळी, माजी नगरसेवक शंकर बेलदरे, आंबेगाव ब्रुद्रुकचे माजी सरपंच संतोष ताठे, उप सरपंच दिनेश कोंढरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसृष्टीत आयोजित करण्यात आलेल्या या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराविषयी अधिक माहिती देताना अनिल पवार म्हणाले, “लोप पावत असलेल्या शिवकालीन युद्धकलांची माहिती नव्या पिढीला व्हावी, त्यांना त्याचे महत्त्व कळावे या उद्देशाने प्रतिष्ठानच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सहभागी शिवप्रेमींना व्यायाम प्रकार, लाठी काठी, भाला, तलवार आणि दांड पट्टा यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी झालेल्या सर्वांनी या शिबिराचा मनमुराद आनंद लुटत या कलांची मनापासून माहिती घेतली. या आगळ्यावेगळ्या शिबिराचे कौतुक पालकांनीही केले.”