Team MyPuneCity : नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपलीकडे स्वतःचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ज्योती भक्त (Jyoti Bhakt) यांनी सायकलवरून तब्बल ३,००० किलोमीटरची ‘नर्मदा परिक्रमा’ पूर्ण करत आत्मशोधाचा अद्भुत प्रवास केला. प्राची जोशी हर्षे यांनी शब्दांकित केलेली ही प्रेरणादायी कथा, केवळ प्रवासाची नव्हे, तर जगण्याच्या नव्या अर्थाची आहे.
स्वत:चा शोध… सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणारी ‘मैय्या’ – ज्योती भक्त यांची प्रेरणादायी कहाणी
शब्दांकन – प्राची जोशी हर्षे, पुणे
पुण्यात राहणारी ज्योती भक्त (Jyoti Bhakt), तुमच्या-आमच्यासारखी एक साधी, शांत स्वभावाची स्त्री. नोकरी करत घर उत्तमरितीने सांभाळणारी! काळ आपल्या गतीने पुढे सरकत असतो, तशीच तिचंही आयुष्य नोकरी, संसार, कर्तव्यपूर्ती आणि वयानुसार येणाऱ्या टप्प्यांमधून वाटचाल करत होतं.
पन्नाशीत प्रवेश करताना, जेव्हा मुलाचं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण झालं, त्या टप्प्यावर तिच्या मनात एक वेगळीच जाणीव जागी झाली — ‘संसार आणि नोकरी’ या चक्रातून बाहेर पडून आता स्वतःसाठी काहीतरी वेगळं करावं. ‘मला खरंच आयुष्यात काय करायला आवडेल?’ हा प्रश्न अधिकाधिक सतावू लागला. आणि मग २०१७ मध्ये, बराच विचार करून, महिन्याच्या पगाराची निश्चितता देणारी कॉर्पोरेट नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला.

पण पुढे काय करायचं? स्वतःच्या शोधाची ही सुरुवात कुठून करावी, हे स्पष्ट नव्हतं. पंचवीस वर्षांच्या संसारात स्वतःच्या इच्छा, गरजा यांना वेळ मिळालाच नव्हता. आणि जेंव्हा विचार करायला लागलं, तेंव्हा ‘माझ्या निर्णयामुळे घरच्यांवर अन्याय तर होत नाही ना?’ याची टोचणी सतत लागून राहत होती. त्यामुळे “मला काय करायला आवडेल?” असा प्रश्नही प्रयत्नपूर्वक विचारायची सवय लावावी लागली.
Harshal Alpe : ‘अर्वान’ लघुपटाला दिग्दर्शनासाठी ‘बेस्ट ऑफ पुणे’ पुरस्कार; हर्षल आल्पे यांचा सन्मान
स्वेच्छानिवृत्तीनंतर ज्योतीने (Jyoti Bhakt) स्वतःच्या उत्तरांच्या शोधासाठी विविध गोष्टी करून पाहिल्या. देश-विदेशात भ्रमंती केली. तरीही काहीतरी अधुरं वाटतच राहिलं. याच दरम्यान कोविड आलं आणि जग थांबून गेलं. पण ज्योतीच्या आयुष्यात मात्र एक नवी साथीदार आली – सायकल.

कोविड काळात तिने घरी strength training सुरू केलं. बंधनं थोडी शिथिल झाल्यावर, मैत्रिणींसोबत १६ किमीची सायकल राईड केली. पहिल्याच दिवशी शरीर थकून गेलं, पण मनात मात्र “उद्या पुन्हा सायकल चालवायचीच” हा निर्धार तयार झाला. दुसऱ्या दिवशी आदल्यापेक्षा १० किलोमीटर जास्त… अशा पद्धतीने तिचं सायकलिंग सुरू झालं.
सिंहगड चढ-उतर करत बळ वाढत गेलं. २०२१ मध्ये वाढदिवसाला पुणे ते पनवेल अशी राईड करून तिने स्वतःचा आनंददायक वाढदिवस साजरा केला. सायकल तिच्या (Jyoti Bhakt) आयुष्याचा अविभाज्य भाग बनू लागली. समान विचारसरणीचा ग्रुप मिळाला आणि तिची सायकल जणू सुसाट धावू लागली. तिला जाणवलं — “सायकल हेच आपलं श्रेयस आणि प्रेयस आहे!”
नंतर पुणे ते सुंदरबन (२१०० किमी), श्रीनगर-लेह-खारदुंगला, मेळघाट, तामिळनाडू अशा सायकल सफारी झाल्या. एव्हरेस्ट बेस कॅम्पसारखे ट्रेकही झाले.

तिच्या मनात विचार आला — “जेव्हा इतकं सायकलिंग करते, तेव्हा पवित्र अशी ‘नर्मदा परिक्रमा’ सायकलवर करायला हवी!”
नोव्हेंबर २०२४ मध्ये हा विचार मनात रुंजी घालू लागला. जानेवारी २०२५ च्या अखेरीस ३००० किमीची परिक्रमा साधारणतः ४० दिवसांत पूर्ण करायचं ठरवलं — म्हणजे रोज जवळपास ९० ते १०० किमी सायकलिंग.
सायकलिंगचा सराव तर होताच, पण मानसिक तयारी अधिक महत्त्वाची होती. कारण हा एकट्याचा प्रवास होता. सामान स्वतःच्या सायकलवर वाहून न्यावं लागणार होतं. त्यासाठी वजन नियोजन, पंक्चर काढणं, सायकल दुरुस्ती शिकणं, मार्ग आखणं, YouTube व्हिडिओ बघणं, अनुभवी सायकलपटूंची मदत घेणं सुरू झालं.

हायवे नव्हे, तर गावोगावच्या रस्त्यांनी नर्मदामाईच्या सान्निध्यातून जाण्याचा निर्णय घेतला.
२२ जानेवारीला पुण्याहून इंदूरला निघण्याची तयारी झाली. एकटीने (Jyoti Bhakt) जाण्याचं दडपण होतं, पण नर्मदामाईचं आकर्षण आणि सायकलची साथ हे दडपण हलकं करत होतं. निघायच्या दोन-तीन दिवस आधी सायकलिंग ग्रुपमधील शिरीष लोणकर ज्योतीबरोबर जाण्यास तयार झाले.
२३ जानेवारीला ममलेश्वर येथून परिक्रमेचा संकल्प घेऊन सायकलला पेडल मारलं आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास. हा प्रवास केवळ मैलांचा नव्हता, तर एक नदी, तिच्या संस्कृती आणि आपल्या अंतर्यामीच्या शोधाचा होता. पुढे या प्रवासात अजून तीन सायकलस्वार — गजेंद्र मंडलोई, संदीप बिर्ला आणि संदीप इर्ला — ज्योती आणि शिरीषला भेटले.
या पंचकाने एकत्रितपणे ही परिक्रमा पूर्ण केली. ज्योती म्हणते, “मी एकटी निघाले होते. पण माझ्या सकारात्मकतेमुळे आणि माईच्या कृपेने ब्रह्मा-विष्णु-महेशासारखे तीन साथीदार मला मिळाले!”

खडबडीत रस्ते, ऐतिहासिक स्थळं, संतांची आश्रमं, घाट-चढ उतार अशा मार्गावरून वाटचाल सुरू झाली. रावेरखेडी येथील थोरल्या बाजीरावांची समाधी, ‘नर्मदालय’ सारखं सेवाभावी कार्य करणाऱ्या भारती ठाकूर यांचं केंद्र अशा गोष्टींचा अनुभव मिळत गेला.
एका लहानशा गावातील आजीनं दिलेला चहा आणि शेवटच्या अन्नाचा चिवडा, त्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा समाधानाचा भाव — हा अनुभव ज्योतीला (Jyoti Bhakt) आजही गहिवरून टाकतो. ती म्हणते, “दानत म्हणजे काय असते हे त्या माईने शिकवलं.”
ही परिक्रमा म्हणजे केवळ प्रवास नव्हे, ती नदीच्या मातृत्वावरचा विश्वास, निरपेक्ष सेवा, आणि स्वतःच्या आत्मशोधाचा एक अविस्मरणीय टप्पा ठरतो.

“मैय्या” म्हणत गावागावांतून साद दिली जायची. सायकलवरून चिखलातून, झाडीतून जाताना दमछाक व्हायची; पण “नर्मदे हर” चा जप करत करत पुढे चालत राहणं हेच तिचं (Jyoti Bhakt) नवं बळ होतं.
कधीकधी पाय दुखायचे, तरीही संकल्प पूर्तीसाठी पुढे जाणं सोडायचं नाही. विमलेश्वर येथे तटपरिवर्तन करून उत्तर तटावर आले. पुढे मजल-दरमजल करत करत अखेर ओंकारेश्वर जवळ आलं आणि २५ फेब्रुवारी रोजी ३००० किलोमीटरची ही नर्मदा परिक्रमा ३४ दिवसांत पूर्ण झाली.
या प्रवासातून ज्योतीला लाभलेली शिकवण अनमोल आहे —
वैयक्तिक गरजा कमी ठेवून जगता येतं, सेवा निरपेक्ष असू शकते, आणि स्वतःच्या ध्येयावरचा विश्वास सर्वात मोठं बळ ठरतो.
आजही ती म्हणते,
“नर्मदा माझ्या अंत:करणात झुळझुळते आहे… नवी उमेद, नवा दृष्टिकोन देते आहे!”
तिच्या या अनुभवातून प्रेरणा घेऊन ती पुढच्या अशाच एका सायकल प्रवासाचा विचार करते आहे.
ज्योती भक्त यांची ही परिक्रमा केवळ सायकलवरचा प्रवास नाही, तर स्वतःचा शोध घेण्याची, आयुष्याच्या नव्या अध्यायात प्रवेश करण्याची एक जिवंत, प्रेरणादायी कहाणी आहे.
🙏🏼 नर्मदे हर 🙏🏼
ज्योती भक्त – ९८८१७२८३१६
शब्दांकन – प्राची जोशी हर्षे, पुणे