Team MyPuneCity – पंधराव्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ‘अर्वान’ या लघुपटाने दिग्दर्शनाच्या श्रेणीत मानाचं यश मिळवत उपस्थित रसिकांची दाद मिळवली. या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हर्षल आल्पे (Harshal Alpe) यांना ‘बेस्ट ऑफ पुणे (दिग्दर्शक)’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘अर्वान’ या लघुपटाची निर्मिती स्मिता आल्पे यांनी केली असून, कार्यकारी निर्माते म्हणून श्रीपाद दीक्षित यांचे योगदान लाभले आहे. संकलन वज्रांग आफळे यांचे असून, आदित्य देशपांडे, ऋचा पोंक्षे, योगंधरा बढे, मीनल रणदिवे आणि अभिषेक विरकर या कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
नळ स्टॉप येथील लोकायत सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ निर्माते नितीन लचके आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हर्षल आल्पे (Harshal Alpe) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला पुण्यातील अनेक चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पुरस्कार स्वीकारताना हर्षल आल्पे (Harshal Alpe) म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नाही, तर संपूर्ण टीमचा आहे. पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल व मराठी चित्रपटसृष्टीचे मन:पूर्वक आभार. योगेश बारसेकर यांचेही विशेष आभार. वेगळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेच सुरू राहतील.”
‘अर्वान’च्या या यशामुळे नवोदित चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना प्रेरणा मिळणार असून, मराठी लघुपट क्षेत्रात अधिकाधिक सृजनशील प्रयोग घडून येण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.