मावळ ऑनलाईन – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने गारायराण परिसरात विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्क आणि अभंग गाथा पार्क येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात बायसन केमिकल अॅण्ड इंजिनीअर्स कंपनीच्या वतीने देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन बायसन कंपनीचे संचालक संजय तवरेज आणि संदेश जगदाळे, नगराध्यक्षा पूजा दिवटे तसेच वृक्षदायी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कंपनीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
“प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा संकल्प आम्ही करतो आणि पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने काम करणार आहोत,” असे संजय तवरेज यांनी सांगितले.
या उपक्रमात वृक्षदायी संस्थेचे सचिव संतोष हगवणे, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेवक आदित्य टिळेकर, अभंग संस्थेचे सचिव विकास कंद, सुहास पाटील, सोमेश्वर प्रसारक मंडळाचे संस्थापक अंकुश बोडके, तसेच पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव पी. बी. कुंभार यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींचाही सहभाग लाभला. वृक्षारोपणासोबतच निसर्गसंवर्धनाच्या प्रतिज्ञाही घेण्यात आल्या.
ऑक्सिजन पार्क व अभंग गाथा पार्क परिसरात होत असलेला हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास सहभागी पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला.