Team MyPuneCity – आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत ( Shiva Srushti)असलेल्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आता इच्छुकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करीत तिकीट काढावे लागणार असून येत्या शुक्रवार दि. ६ जून, २०२५ पासून शिवसृष्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.shivsrushti.com/visitus ही नोंदणी करता येणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी कळविली आहे.
Crime News : तरुणावर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न
आशिया खंडातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित होत असलेल्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी शिवप्रेमींची प्रचंड गर्दी होत असून अधिक चांगल्या पद्धतीने शिवसृष्टीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने प्रवेश नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिवसृष्टी निर्माणाची जबाबदारी असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले.
शिवकालीन वैभवाची साक्ष देणारा सरकारवाडा, भवानी मातेचे मंदिर, यांबरोबरच इतिहासाचे वैभव दाखविणाऱ्या वास्तू, विविध प्रकारे कथा, गोष्टी, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांद्वारे शिवसृष्टीत शिवरायांचा काळ उतरला असून त्याची अनुभूती आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही अनुभूती घेण्यास इच्छुक असलेल्या शिवप्रेमींकडून येत्या १५ जुलै पर्यंतच्या मर्यादित कालावधीसाठी नाममात्र ५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जात आहे. पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाले असून याचा लाभ अधिकाधिक नागरीकांनी घ्यावा असे आवाहनही अनिल पवार यांनी ( Shiva Srushti) केले आहे.




















