बंधुता दिनी सातव्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवात विश्वबंधुता भूषण पुरस्काराने सन्मान
Team MyPuneCity – “स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. भाषिक अस्मिता व प्रादेशिक संस्कृती जपणारी दक्षिणेकडील राज्ये आजही प्रगती करताना दिसत आहेत. भाषा आचार व विचार प्रसाराचे माध्यम आहे. आपली मराठी भाषा, संस्कृती संपवली जात असताना आपण गप्प बसणे योग्य नाही. बंधुतेच्या तत्वाने त्याचा विरोध करून मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी केले. ज्यांच्या घामाने इमारती उभ्या राहता, त्यांना राहायला घर नाही. मात्र, राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीने ठराविक लोक २०-२५ मजल्याच्या बंगल्यात राहतात, हा विरोधाभास आजही कायम असून, ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित सातव्या बंधुता काव्यमहोत्सवाच्या समारोपावेळी कॉ. अजित अभ्यंकर व प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना ‘विश्वबंधुता भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, संविधानाची प्रत व तिरंगी उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय नगरकर म्हणाले, “सध्याच्या काळ भयानक असून, जाती-जातीमध्ये उभ्या झालेल्या भिंती, वर्णभेद अयोग्य आहे. यातून बाहेर पडून चांगला समाज घडायचा असेल, तर बंधुतेचा विचार तळागाळात रुजणे खूप आवश्यक आहे. साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून नवीन पिढीला सत्य आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे लिखाण करायला हवे.”
बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “वयाच्या अठराव्या वर्षांपासून बंधुतेची कावड खांद्यावर घेऊन समाजात बंधुभाव व समतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. पाच दशकांच्या या प्रवासात प्रेमाने, आपुलकीने माणसांची संपत्ती कमावता आल्याचे समाधान आहे. बंधुता विचारच मानवी जीवनात शांतता व समृद्धी आणू शकते. त्यामुळे बंधुतेचा विचार खोलवर रुजविण्याची गरज आहे.”
प्रा. भारती जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.