Team MyPuneCity – पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वाघोली येथे अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार करून आर्थिक लाभ मिळवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत युनिट ६ गुन्हे शाखेच्या पथकाने कॉलेज प्राध्यापकासह चार जणांना अटक केली. ही कारवाई ३ जून २०२५ रोजी पोलिसांनी सापळा रचून केली.
यासंदर्भात सपोनि मदन कांबळे यांना माहिती मिळाली होती की, वाघोलीतील पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक प्रितिक सातव हे विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन ‘इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स – २’ या विषयाचा पेपर परत लिहिण्याची संधी देत आहेत.
ही माहिती मिळताच पोलिसांनी ३ जून रोजी कॉलेजमध्ये छापा टाकला असता, प्राध्यापक प्रितिक किसन सातव (३७, रा. केसनंद, वाघोली), तसेच आदित्य यशवंत खिलारे (२०), अमोल आशोक नागरगोजे (१९) व अनिकेत शिवाजी रोडे (२०) सर्व रा. वाघोली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून परीक्षेच्या सहा उत्तरपत्रिका बंडल्स, २ लाख ६ हजार रुपयांची रोकड व कंट्रोल रूमची बनावट चावी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासादरम्यान समोर आले की, सदर प्राध्यापक व त्यांच्या साथीदारांनी कॉलेजच्या परीक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी वापरून उत्तरपत्रिका चोरून बाहेर काढल्या आणि परीक्षेत नापास होण्याची भीती असलेल्या आठ विद्यार्थ्यांकडून १० ते ५० हजार रुपये घेवून त्यांना पुन्हा पेपर लिहिण्याची संधी दिली.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात भादंवि कलम ३०३(२), ३१८(२)(३)(४), ६१(२) सह सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक २०२४ मधील कलम ४, ५, १०, ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे व सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार कारखेले, सकटे, तांबेकर, काटे, डोंगरे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांनी केली.