Team MyPuneCity –खराडी परिसरातील एका ३४ वर्षीय महिलेला ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला या खराडी, पुणे येथे वास्तव्यास असून, त्यांनी २२ मे २०२५ ते २४ मे २०२५ या कालावधीत आरोपीने दिलेल्या लिंकवर टास्क पूर्ण करून ऑनलाईन अकाउंट तयार केले. त्यानंतर आरोपीने काही रक्कम परतवून अधिक नफा मिळेल असे सांगून त्यांच्या खात्यावरून १२,६३,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही.
बेलबाग चौकात गर्दीचा फायदा घेत ३ लाखांचे दागिने लंपास
कपडे खरेदी करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ५५ वर्षीय महिलेच्या पिशवीतून ३ लाख १ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी महिला या पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असून, त्या गणपतीचे दर्शन घेऊन बेलबाग चौकात कपडे खरेदी करत होत्या. ३१ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत बाबु गेनु चौक परिसरात बिल देताना त्यांच्या पिशवीतून अज्ञात व्यक्तीने दागिने चोरी करून नेले.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस अंमलदार कदम पुढील तपास करीत आहेत.
महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मानसिक त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन महिलांसह एक पुरुषाविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत वर्षा तुकाराम रणदिवे या धनकवडीतील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. ८ मे २०२५ रोजी सायंकाळी त्यांनी घराच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेच्या पतीच्या फिर्यादीनंतर चौकशीअंती पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
स्वारगेट बसस्थानकात वृद्धेच्या हातातील सोन्याची बांगडी कटमारांनी लंपास केली
स्वारगेट बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ७४ वर्षीय महिलेला धक्का देत त्यांच्या हातातील १ लाख ५० हजार रुपयांची सोन्याची बांगडी कापून चोरी केली.
ही घटना २३ मे २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान नटराज हॉटेलसमोरील पीएमपीएमएल बसमध्ये घडली. वृद्ध महिला वडगाव बु. येथे राहतात.
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार राऊत तपास करत आहेत.
—
प्रवासादरम्यान बलोनो कारमधून प्रवाशाला मारहाण करून ३५ हजारांचा ऐवज लांबवला
कोल्हापूरला जाण्यासाठी व्हिआरएल ट्रॅव्हल्सजवळून कारमध्ये बसलेल्या २५ वर्षीय तरुणास चार अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्यांनी मारहाण करून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली.
३० मे २०२५ रोजी रात्री १२ च्या सुमारास स्वर्णा हॉटेल, वडगाव बु. समोरील हायवेवर ही घटना घडली. गाडी नवले ब्रिज पार केल्यानंतर आरोपींनी मारहाण करत तरुणाच्या जवळील रोकड, दागिने व मोबाईल जबरदस्तीने चोरले.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.