तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधी वितरण; २८३ लाभार्थ्यांना ९० लाखांचा प्रारूप धनादेश वाटप
Team MyPuneCity –दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिव्यांगांसाठी संधी निर्माण केल्या तरच त्यांच्या विकासाचा खरा अर्थ साधता येईल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (३१ मे) नगर परिषद कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात आमदार शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी दिव्यांग प्रतिनिधी छाननी समितीमार्फत करण्यात आली. त्यानुसार पात्र ठरलेल्या एकूण २८३ UDID कार्डधारक लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना एकूण ९० लाख रुपयांच्या निधीचा प्रारूप धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आला.
Express Way Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव मिक्सरने उडवलं; जागीच मृत्यू
या कार्यक्रमात आमदार शेळके यांनी पुढे बोलताना सांगितले की, “दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर सक्षमपणे जगण्यासाठी संधी व आधार देणं गरजेचं आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने अशा योजनांची अंमलबजावणी करत राहावी.”
कार्यक्रमाला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, दिव्यांग संघटनेचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषद प्रशासनाच्यावतीने सर्व मान्यवर, लाभार्थी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत नगर परिषदेचे आभार मानले.