Team MyPuneCity – पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली विश्वास संपादन करून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पनवेलमधून सायबर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
ही फसवणूक नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. फिर्यादी यांना व्हॉट्सॲप कॉलवरून पोलिस असल्याचे भासवून, त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीला सातत्याने मानसिक दबाव टाकत त्यांच्या बँक खात्यातून एकूण ६ कोटी २९ लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित करून घेतली.
PCMC: ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाद्वारे सफाई सेवकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा प्रयत्न
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला होता. तपासादरम्यान ११ नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या खात्यातून २० लाख रुपये एका ‘श्री धावीर कन्स्ट्रक्शन’ (ता. रोहा, जि. रायगड) या कंपनीच्या खात्यात वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या खात्यातून ९० लाख आणि २० लाख रुपयांच्या एफडीज केल्या गेल्या होत्या. सदर खात्याचा संबंध तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) याच्याशी असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी कोकबन परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी पळून गेला होता. मात्र त्यानंतर पनवेलमधील मोर्बे गावातील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरात त्याच्या उपस्थितीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
तुषार वाजंत्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपीविरोधात राष्ट्रीय सायबर पोर्टलवर विविध राज्यांमधील ५ तक्रारी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरु आहे. या प्रकरणात केरळ पोलीस व पुणे सायबर पोलीस परस्पर संपर्कात राहून तपास करत आहेत.
संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जानवी भडेकर, संदीप पवार, संदीप यादव, सचिन शिंदे व सतीश मांढरे यांनी सहभाग घेतला.