Team MyPuneCity – येरवडा परिसरातील बसमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून १.२५ लाख रुपये किमतीची साखळी जप्त करण्यात आली आहे.
सुशांत शंकर गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, खराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि. २७ मे २०२५ रोजी येरवडा परिसरात एका प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.
Pune Murder: आंबेगाव बुद्रुकमध्ये महिलेचा धारदार शस्त्राने खून; आरोपीचा शोध सुरू
पोलिस अंमलदार विजय अडकमोल व नटराज सुतार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, एक इसम सोन्याची तुटलेली साखळी विकण्यासाठी येरवडा बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने सापळा रचत आरोपीला पळून जात असताना पकडले. आरोपी सुशांत गायकवाड याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
येरवडा पोलीस (Yerwada Police) स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे. सदर साखळीची किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये असून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, तसेच पोलीस अंमलदार तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, महेंद्र शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, भीमराव कांबळे, बालाजी सोगे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, नवनाथ गांगुर्डे आदींनी सहभाग घेतला.