Team MyPuneCity – महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) मार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बससेवा पुरवण्यात येते. या सेवेच्या प्रवास भाड्यात १ जून २०२५ पासून सुधारित स्टेज रचनेनुसार बदल करण्यात येणार असून, नव्या दरांची अंमलबजावणी पहाटेपासूनच सुरू होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३१ मार्च २०१८ रोजीच्या राजपत्रानुसार, तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर PMPML ने प्रवासात सुसूत्रता यावी यासाठी स्टेज रचनेत बदल करत, ५ व १० किमी अंतरावर आधारित ११ स्टेज निश्चित केल्या आहेत. या रचनेनुसार १ किमी ते ८० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. यास PMPML च्या संचालक मंडळ व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिली आहे.
जुन्या पासधारकांसाठी विशेष सूचना:
- ₹९०० मासिक पास (एक मनपा हद्दीतील) वापरणाऱ्यांना, जर त्यांचा पास १ जूननंतरही वैध असेल, तर तो पास केवळ त्या तारखेपर्यंतच स्वीकारला जाईल.
- ₹१२०० मासिक पास (दोन्ही मनपा हद्दीतील) वापरणाऱ्यांनाही १ जूनपासून केवळ त्याच तारखेपर्यंतच जुन्या दरात प्रवासाची परवानगी राहणार आहे.
- विद्यार्थी पासधारकांकरिता मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक पास तसेच पंचिंग पास या सर्वांवर ५०% सवलतीसह जुन्या दरानुसारच दर आकारणी केली जाणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन व मासिक पास तसेच पीएमआरडीए हद्दीतील मासिक पास यामध्ये कोणताही दरबदल करण्यात आलेला नाही.
Pune:गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव
PMPML ने प्रवाशांना विनंती केली आहे की, या बदलांबाबत समजून घेवून कंडक्टर आणि अन्य सेवा कर्मचारी यांना सहकार्य करावे.
प्रवाशांनी नवीन दरांबाबत अधिक माहिती व स्टेजनिहाय प्रवास योजना PMPML च्या अधिकृत वेबसाइटवर वा स्थानिक बस स्थानकांवर उपलब्ध सूचना फलकांवरून तपासाव्यात, असे पीएमपीएमएलच्या पत्रकात म्हटले आहे.