Team MyPuneCity – देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदावर प्रियंका मोरे यांची शुक्रवारी (३० मे) दुपारी बिनविरोध निवड झाली. ही घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली. मागील चार वर्षांत उपनगराध्यक्षपदावर झालेली ही पाचवी निवड असून, प्रियंका मोरे या त्या पदावर विराजमान झालेल्या पाचव्या (Priyanka More) उपनगराध्यक्ष ठरल्या आहेत.
माजी उपनगराध्यक्ष मयुर शिवशरण यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. या निवडणुकीत प्रियंका मोरे यांच्याकडून (Priyanka More) एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. नियमानुसार अर्ज स्वीकृती, छाननी व माघार प्रक्रियेनंतर त्यांचा अर्ज एकमेव ठरल्याने दुपारी २.२० वाजता त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या देखरेखीखाली पार पडले. नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्यासह १४ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मात्र नगरसेविका पूजा काळोखे, रसिका काळोखे व सपना मोरे या तीन सदस्यांनी गैरहजेरी लावली.
प्रियंका मोरे यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात विजयानंतरचा जल्लोष साजरा केला. परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मोरे यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला.
प्रियंका मोरे यांची ही निवड वारकरी परंपरेच्या पवित्र भूमीत झाल्यामुळे विशेष महत्त्वाची मानली जात असून, पुढील काळात त्या देहू नगरपंचायतीच्या कारभारात सक्षम (Priyanka More) भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.