Team MyPuneCity – पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथे चार अल्पवयीन मुलांनी दोन अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्राने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी फोनवर झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (२५ मे) सायंकाळी घडली.
याप्रकरणी सोमाटणे फाटा येथील जखमी मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अल्पवयीन मुलांमध्ये दोन दिवसांपूर्वी फोनवर किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. त्या कारणावरून चार मुलांनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर धारदार शस्त्राने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला.
बेकायदेशीरपणे दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक
विक्री करण्यासाठी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (२५ मे) सायंकाळी वाकड येथे करण्यात आली.
गणेश तुकाराम कांबळे (२५), बाळू दत्तू भोगिले (३३, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश गिरीगोसावी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड-भोसरी बीआरटी रोडवरून बेकायदेशीरपणे टेम्पो मधून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यामध्ये दोन लाख ३१ हजार २६३ रुपये किमतीची विदेशी दारू आढळली. पोलिसांनी दारू आणि टेम्पो असा एकूण १० लाख ३१ हजार २६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पिंपळे निलख येथून डांगे चौकातील राहुल बार या दुकानात विक्रीसाठी दारूची वाहतूक करत होते. दारूची वाहतूक करण्याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
घरातून सव्वादोन लाखांचे दागिने चोरीला
घरातून एका चोरट्याने दोन लाख २० हजारांचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना २३ मे रोजी रुपीनगर, तळवडे येथे घडली.
ज्योती राजीव खैरे (३५, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नथूलाल सोलंकी (चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती खैरे यांच्या घरातून नथुलाल याने दोन लाख २० हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने चाकूने वार
रस्त्यात दुचाकी आडवी आल्याने दुचाकीस्वाराला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्या कारणावरून दुचाकीवरील दोघांनी एकावर चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (२६ मे) सकाळी मोहननगर भोसरी येथे घडली.
तबरेज वायजुल हक्क अन्सारी (३४, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एमजी २०४२) चालक आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तबरेज आणि त्यांचा मावसभाऊ शाहनवाज हे दुचाकीवरून त्यांच्या वर्कशॉप येथे जात होते. मोहननगर भोसरी येथे आल्यानंतर आरोपीने त्याची दुचाकी रस्त्यावर आडवी लावली. त्यामुळे शाहनवाज यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी शाहनवाज यांच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर, कमरेवर, मांडीवर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.