Team MyPuneCity – लोणावळ्याजवळ दहिवली गावात एका फार्म हाऊसजवळ किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका ४५ वर्षीय पर्यटकाचा निर्घृण खून (Lonavala Crime) झाल्याची धक्कादायक घटना २५ मे रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजून ४ ते ५ साथीदारांचा शोध सुरू आहे.
मयताचे नाव कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५, रा. आडुर कोंडकारूल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे आहे. या प्रकरणी त्यांचे नातेवाईक मनोज मधुकर वरवटकर (वय ४२, व्यवसाय – मासेमारी, रा. आडुर कोंडकारूल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Indian Economy : जपान इंग्लंडला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी अर्थव्यवस्था
फिर्यादी व त्यांचे नातेवाईक एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी दहिवली गावातील ‘येवले फार्म हाऊस’ येथे टेम्पो ट्रॅव्हलरने मुक्काम केला होता. सायंकाळी ६.४५ ते ७.१५ च्या सुमारास ते मंदिरातून परत फार्म हाऊसकडे जात होते. फार्म हाऊस जवळ रस्ता अरुंद असल्याने त्यांच्या वाहनाचा टर्न बसत नव्हता, म्हणून चालक गाडी मागे-पुढे करत असताना तेथे थांबलेले (Lonavala Crime) काही युवक भांडणास कारणीभूत ठरले.
या वेळी निकेश कांबीरे (रा. कर्जत), प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (वय २७, रा. वेहेरगाव), गौरव संजय पट्टाधारी (वय २२, रा. तुंगार्ली, लोणावळा) आणि त्यांचे ४ ते ५ साथीदारांनी जमाव तयार करून गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी चालकाकडून गाडीची चावी हिसकावून घेतली आणि फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांवर लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, लादी पुसायचे वायपर व इतर हत्यारांनी बेदम मारहाण केली.
मारहाणीत मयत कमलेश धोपावकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपींनी शिवीगाळ करत संपूर्ण जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी या प्रकरणाचा (Lonavala Crime) तपास करत आहेत.