Team MyPuneCity – मंगळवार पेठेतील भिमनगर स्टेजजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या व्यक्तीला व त्याच्या मित्राला वेगात गाडी चालवण्यास विरोध केल्याच्या कारणावरून धमकी देत पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या दोघा इसमांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (२५ मे) पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी गोखलेनगर, पुणे येथील ३६ वर्षीय एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित दिलीप माने (वय ३२, रा. लोहियानगर, खडक, पुणे) आणि कासीम असिफ अन्सारी (वय २३, रा. कागदीपुर, कसबापेठ, पुणे) यांना अटक केली आहे.
Pune Crime News 25 May 2025 : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक
फिर्यादी व त्यांचे मित्र भिमनगर स्टेजजवळ गप्पा मारत थांबले असताना, आरोपी दोघे मोपेडवरून जोरात फिर्यादीसमोरून गेले. त्यांनी आरोपींना अडवून, “वस्तीमध्ये अशा प्रकारे जोरात गाडी चालवू नका, तुम्ही रस्ता चुकलात का?” असे विचारले असता, आरोपी संतप्त झाले. त्यांनी गाडी थांबवून खाली उतरून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली आणि “भाईला ओळखत नाही काय?” असे म्हणत रोहित माने याने आपल्या कमरेतील पिस्तूल काढून फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या दिशेने रोखले. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने फायरींग करत परिसरात दहशत निर्माण केली.
सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान, भारतीय हत्यार कायदा, क्रिमिनल लॉ अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.