Team MyPuneCity – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पैशांसाठी मागणी, मारहाण आणि छळ असे प्रकार घडत होते. समाज प्रगत होत असतानाही अशा घटना घडणे लाजिरवाणे आणि अमानवी आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. या घटनेनंतर वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी वाकडमध्ये भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे आदी या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, वैष्णवीसारखी मुलगी, जी नऊ महिन्यांच्या बाळासमोर असे पाऊल उचलते, यामागे परिस्थिती किती गंभीर होती हे दिसून येते. तिच्या कुटुंबाची मानसिक अवस्था अतिशय ढासळलेली आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊनच राज्य सरकार कडक पावले उचलेल. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या घटनेला जबाबदार असणाऱ्याला कोणीही पाठीशी घालणार नाही. गृह विभागही या प्रकरणात सक्रिय आहे. जो कोणी दोषी असेल, त्याला वाचवले जाणार नाही. कोणीही मोठा असो, त्याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कोणतेही राजकारण न करता, समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य सरकार सजग असून, कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.