आज केरळमध्ये मान्सून दाखल; हवामान खात्याची अधिकृत घोषणा
Team MyPuneCity – देशभरात उन्हाच्या तीव्र लाटेनंतर (Monsoon) दिलासा देणाऱ्या पावसाची चाहूल केरळमध्ये लागली असून, दक्षिण-पश्चिम मान्सूनने वेळेपेक्षा तब्बल आठवडाभर आधी म्हणजेच २४ मे २०२५ रोजी केरळमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, हा मान्सून २००९ नंतर सर्वात लवकर केरळमध्ये दाखल झाला आहे.
सामान्यतः दक्षिण-पश्चिम मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा हवामानातील बदलांमुळे तो आठवडाभर आधी म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. यापूर्वी २००९ साली २३ मे रोजी मान्सून दाखल झाला होता, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान, मागील रात्रीपासून केरळच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. ठिकठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्यामुळे वाहतूक खोळंबली अ(Monsoon) सून, विजेच्या ताराही तुटल्याने धोका निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, अलाप्पुझा, त्रिशूर, इडुक्की आणि मल्लाप्पुरम या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासन सतर्कतेने काम करत आहे.
केरळमधील वेळेपूर्वी आलेल्या मान्सूनमुळे देशातील इतर राज्यांमध्येही पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणीटंचाई आणि उष्णतेने होणाऱ्या संकटांपासून दिलासा मिळण्याची चिन्हे (Monsoon) आहेत.