Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी फरार असलेले आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयात हजर करताच शिवाजीनगर कोर्ट परिसरात भाजप महिला आघाडीने संतप्त निदर्शने केली. आरोपींवर टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न झाला, तर बॅनरला चप्पलने मारहाण करत “हगवणे मारेकरीच आहेत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोर्टाने या दोघा आरोपींना (Vaishnavi Hagawane Suicide Case) ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाजप महिला आघाडीच्या नेत्या हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास धडक देत तीव्र घोषणाबाजी केली. आरोपी हगवणे पिता-पुत्र कोर्टात आणले जात असताना उपस्थित महिलांनी त्यांच्यावर टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.
दरम्यान, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनाचे कौतुक करत, “शाब्बास माझ्या वाघीणींनो, आवाज नेहमी बुलंद ठेवा” असा संदेश दिला. त्यांनी आरोपींना (Vaishnavi Hagawane Suicide Case) फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत संताप व्यक्त केला.
फरार आरोपींची अटक
वैष्णवी हगवणे हिचा पती, सासू व नणंद यांना आधीच अटक करण्यात आली होती. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे फरार होते. वैष्णवीवर सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक छळ करत हुंड्यासाठी पैशांची मागणी केली होती. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या (Vaishnavi Hagawane Suicide Case) केली होती. अखेर आज पहाटे पोलिसांनी फरार आरोपींना ताब्यात घेतलं आणि कोर्टात हजर केलं.