Team MyPuneCity – खंडणीसाठी एका तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले होते. मात्र कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police) तात्काळ कारवाईमुळे फक्त चार तासांत त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना २१ मे २०२५ रोजी कोंढवा परिसरातील एन.आय.बी.एम. रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीमध्ये घडली.
फिर्यादी हे कोंढवा येथे वास्तव्यास असून, त्यांची बालपणीची मैत्रीण सोनल उर्फ सोनी अतुल रायकर (वय ३५, रा. एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा खुर्द) हिने फिर्यादीस चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले.
घरात पोहोचताच सोनलने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना जखमी केले. त्याचवेळी तिचा पती अतुल रायकर (वय ३८), रॉबिन उर्फ रवी मंडल (वय २४, रा. लोणकर चाळ, कोंढवा खुर्द) आणि सुरेश उर्फ सुशांत कुमारसुरवाती हान (वय ३१, रा. लोणकर चाळ, कोंढवा खुर्द) यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याच मदतीने फिर्यादीच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय रस्सीने बांधून खोलीत डांबून ठेवण्यात आले.
त्यानंतर त्याच्याकडून एटीएम कार्ड आणि मोबाईल घेण्यात आले. तसेच घरातील दागिने व पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला संदेश पाठवून दागिने व पैसे तयार ठेवण्यास सांगितले.
या प्रकाराची माहिती रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (Kondhwa Police), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रौफ शेख यांना कळवले. त्यांनी तातडीने कारवाई करत तपास पथकाला मार्गदर्शन केले. सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, राकेश जाधव, सुकेशिनी जाधव आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून सनश्री सनटेक सोसायटी येथून फिर्यादीस चार तासांत सोडवले.
या प्रकरणी सोनल रायकर, अतुल रायकर, रॉबिन मंडल आणि सुरेश हान या चौघांविरुद्ध कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून पोलिस कोठडी रिमांड घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (Kondhwa Police), पोलीस निरीक्षक रौफ शेख, नवनाथ जगताप यांच्यासह तपास पथकाने हे यश संपादन केले.