Team MyPuneCity – वडगाव मावळ येथील भूमिअभिलेख कार्यालयातील (Land Records Office) कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तालुक्यातील भूमिअभिलेखाशी संबंधित सर्व कामकाज ठप्प झाले असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील आठवड्यापासून बंद
महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना (पुणे विभाग) आणि संलग्न संघटनांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. २४ कर्मचाऱ्यांच्या या संपात मुख्यालय सहाय्यक, अभिलेखपाल, भूकरमापक, लिपिकवर्ग आणि इतर कर्मचारी सहभागी आहेत. परिणामी, शासकीय मोजणी, रेकॉर्ड तपासणी, नकाशे मिळवणे, शेतीसंबंधी प्रलंबित खटले अशा महत्त्वाच्या सेवा थांबल्या आहेत.

संपाचा फटका नागरिकांना
मावळ तालुक्याच्या मुख्यालय वडगाव नगरपंचायत हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र, कार्यालय (Land Records Office) बंद असल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आंदोलनाची माहिती नसल्याने ते वारंवार हेलपाटे मारत आहेत.
शासनाचे दुर्लक्ष
भूमिअभिलेख (Land Records Office) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने अद्याप दखल घेतली नसल्यामुळे संप कधी मिटेल याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर अवलंबून असलेल्या शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत. तातडीने तोडगा निघावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.