Team MyPuneCity -शांतीबन चौक ते आशीष गार्डन चौक या डी.पी. रोडवर एका भरधाव कारने मागून धडक दिल्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात १९ मे रोजी रात्री ८.१० च्या सुमारास झाला.
प्रियंका पानसे (वय ४४, रा. कोथरूड) या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला. अज्ञात कार चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत, हयगयीने आणि भरधाव वेगाने कार चालवून हा अपघात घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून २२ लाख रुपयांची फसवणूक
लोहगाव येथील ३२ वर्षीय महिलेला शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अज्ञात मोबाईल धारकाने तब्बल २२ लाख ६७ हजार ३२८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते १० मे २०२५ पर्यंत सुरू होती.
आरोपीने इंडेक्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून महिलेने पैसे गुंतवले. मात्र काहीच परतावा न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे करत आहेत.
कात्रजमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
वंडरसिटी, शिवराज हॉटेलच्या मुख्य गेटजवळ एका ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना १८ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत पायी चालत असताना चोरट्यांनी मागून येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसरमध्ये सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याने २२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना १९ मे रोजी संध्याकाळी सातववाडी येथील परमानंद बिल्डिंगमध्ये घडली.
दीपा ऊर्फ देवकी प्रसाद पुजारी (रा. सातववाडी, हडपसर) ही सासरी नांदत होती. तिचा पती व नातेवाईकांनी हुंड्यासाठी तिला टोचून बोलणे, मारहाण व मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
हिंजवडी बस स्टॉपजवळ बसमध्ये वृद्धेचे सोन्याचे कडे चोरीस
पुणे – पीएमपीएमएल बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६५ वर्षीय महिलेच्या हातातील ३० हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी ५.२० ते ५.३० च्या सुमारास हिंजवडी बस स्टॉप परिसरात घडली.
फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत बसमध्ये चढत असताना ही चोरी झाली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
बिबवेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून १० लाखांचा ऐवज चोरीला
लोकमान्य नगर येथील पायस सोसायटीत एका बंद फ्लॅटमधील कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० मेच्या पहाटेच्या सुमारास घडली.
फ्लॅटमधील लोखंडी कपाट फोडून रोख ६५ हजार रुपये आणि १० लाख ३३ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण ऐवज चोरीस गेला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
सिंहगड रोडवर फ्लॅटमध्ये घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला
आनंदनगर, सिंहगड रोड येथील आशिष अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात चोरट्याने ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ ते २० मे दरम्यान घडली.
फिर्यादी इसम घराबाहेर गेले असताना त्यांच्या राहत्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ऐवज चोरीस गेला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कात्रज येथे दुकानाचे शटर उचकटून २७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला
कात्रज परिसरातील दहिवडी फाट्याजवळील एका इलेक्ट्रॉनिक दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने २७ हजार ६९५ रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना २२ मे रोजी पहाटे ३.३० ते ५.०० या वेळेत घडली.
फिर्यादी व्यापाऱ्याचे दुकान शटर लावून बंद होते. चोरट्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील कॅश ड्रॉवरमधील रोख रक्कम व काही इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरल्या. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
हडपसरमध्ये महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले
हडपसर येथील महादेवनगर परिसरात एका ३८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना दोन चोरटे मोटारसायकलवरून मागून आले व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून हडपसर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कोथरूडमध्ये शाळेतील विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून चोरट्याचा पळ
पौड फाटा ते वांजपे कॉलेज रस्त्यावर कोथरूड परिसरात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना २२ मे रोजी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
विद्यार्थिनी शाळेला जात असताना ती फोनवर बोलत होती. त्या वेळी एक चोरटा दुचाकीवरून आला आणि तिने हातात पकडलेला मोबाईल हिसकावून फरार झाला. या घटनेनंतर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पर्वतीमध्ये घरफोडी; रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास
पर्वती दर्शनजवळील पंचवटी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरट्याने रोख व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.
फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून कपाट उघडले आणि ऐवज लंपास केला. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.