Team MyPuneCity – चिखली येथे दोन तर चाकण येथे एक कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Crime News 21 May 2025) सुमारे एक किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी मंगळवारी (२० मे) चिखली आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये तिघांना अटक केली आहे.
चिखली येथील पहिल्या कारवाईत विजय किसन छत्री (४२, पिंपरी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून २७ हजार ३०० रुपये किमतीचा ५४६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (२० मे) सायंकाळी पूर्णानगर चिंचवड येथे करण्यात आली.
दुसऱ्या कारवाई मध्ये संतोष सुरेश खोब्रागडे (२६, कुदळवाडी, चिखली) याला अटक करण्यात आली आहे. खोब्रागडे याच्याकडून नऊ हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी खोब्रागडे चेरी चौक ते कुदळवाडी या रस्त्यावर पवार वस्ती येथे गांजा विक्रीसाठी आला असता त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने सार्थक आप्पासाहेब कच्छवा (१८, चाकण) याला अटक केली. सार्थक याच्याकडून १६ हजार ५०० रुपये किमतीचा ३३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सार्थक हा गांजा विक्रीसाठी आला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
Pune Rain : पुणे आणि लोणावळ्यात मुसळधार सरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद
पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू (Pimpri-Chinchwad Crime News 21 May 2025)
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड ते निगडी दरम्यान असलेल्या जकात नाक्याजवळ एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२० मे) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
अमितकुमार बाळासाहेब गवळी (३४, मोशी प्राधिकरण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अमितकुमार यांचा लहान भाऊ अभिषेक बाळासाहेब गवळी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकुमार आणि त्यांचा आते भाऊ धनंजय ठोंबरे हे मंगळवारी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना देहूरोड ते निगडी दरम्यान जकात नाक्याजवळ विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. यामुळे अमितकुमार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये अमितकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
पाच लाखांच्या सेंट्रींग मटेरियलचा अपहार (Pimpri-Chinchwad Crime News 21 May 2025)
पाच लाखांचे सेंट्रिंग मटेरियल वाराणसी येथे पोहोचवण्यासाठी दिले असता ते मटेरियल न पोहोचवता त्याचा अपहार केला. ही घटना १९ एप्रिल रोजी खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.
सुभाष लिंगप्पा पाटील (५६ धनकवडी, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भागवत भगवान बटुले (जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष पाटील हे कन्स्ट्रक्शन व्यवसाय करतात. त्यांनी पाच लाख रुपये किमतीचे सेंट्रींग मटेरियल आरोपी भागवत बटुले याच्या गाडीमध्ये भरून दिले. ते मटेरियल वाराणसी उत्तर प्रदेश येथे पोहोचवायचे होते. मात्र भागवत याने मटेरियल वाराणसी येथे न पोहोचवता ते मटेरियल स्वतःकडे ठेऊन अपहार केला.
जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार (Pimpri-Chinchwad Crime News 21 May 2025)
जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्यास गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (१९ मे) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मधुबन हॉटेल जवळ हिंजवडी येथे घडली.
अक्षय गोरक्षनाथ वने (२७, अहिल्यानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय अनिल फाले (३२, पाषाण, पुणे) आणि त्याच्या तीन मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय फाले याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वने आणि अक्षय भाले यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्या वादाच्या कारणावरून फाले याने त्याच्या तीन साथीदारांना बोलावून अक्षय वने यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तुला खल्लास करतो असे म्हणून जीव घेण्याच्या उद्देशाने अक्षय बने यांच्या मानेवर कोयता मारला. त्यावेळी अक्षय वने यांनी हात मध्ये केला असता कोयत्याचा वार हातावर लागला. यामध्ये अक्षय वने गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
दारू विक्री प्रकरणी एकास अटक (Pimpri-Chinchwad Crime News 21 May 2025)
बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (२० मे) सायंकाळी ताथवडे येथे करण्यात आली.
रसिबाल विठ्ठल कुंभार (३६, ताथवडे) असे अटक केलेले व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सैद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंभार हा बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ हजार रुपये किमतीची ९० लिटर दारू जप्त केली आहे.