मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील सोमवडी गावात जमिनीच्या वादातून आठ जणांनी मिळून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली असून, संबंधित सर्व आरोपींविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १८ मे २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सचिन भरत पवार (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. सोमवडी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, मौजे सोमवडी गावच्या हद्दीत ललित चौधरी यांच्या मालकीची गट क्र. १/१० ही जमीन आहे. या जागेवर वादास कारण ठरलेल्या कुत्र्याच्या उपस्थितीवरून अरुण गणपत कुटे याने फिर्यादी पवार यांच्याकडे बोट करत “ही कुत्री येथे का आली आहेत” असे विचारून शिवीगाळ केली. त्यातून वाद निर्माण झाला.
Pimpri: पॉलिसीच्या नावाखाली 99 हजारांची फसवणूक
हा वाद सोडवण्यासाठी अंजिक्य सुरेश पवार, साहिल गणेश पवार, खंड शिवराम पवार, हिराबाई रमेश पवार, अनिता गणेश पवार हे मध्यस्थी करण्यासाठी आले असताना, आरोपींनी एकत्र येऊन त्यांना हाताने मारहाण केली, शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच “जर पुन्हा इथे आलात तर तुम्हाला जीवे ठार मारीन” अशी धमकीही दिली.
आरोपी अरुण गणपत कुटे आणि गणेश एकनाथ कुटे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी फेकून मारहाण केली. यामध्ये काही व्यक्तींना जखमीही करण्यात आले. या प्रकरणी अरुण गणपत कुटे, गणेश एकनाथ कुटे, रमेश एकनाथ कुटे, रमेश धोंडु कुटे, पप्पू यशवंत कुटे, उल्हास नामदेव बोडके, ताराबाई कोंडू कुटे आणि सिंधू एकनाथ कुटे (सर्व रा. सोमवडी, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई चालू आहे.