Team MyPuneCity – भारतातील खगोलशास्त्राच्या नवयुगाचे शिल्पकार, जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे आज (सोमवार) पहाटे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन (Dr. Jayant Naralikar Passed Away) झाले. ते ८६ वर्षांचे होते. विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
डॉ. नारळीकर यांचे केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र क्षेत्रातही मोठे नाव होते. मात्र त्याचबरोबर त्यांनी सामान्य माणसालाही विज्ञानाची गोडी लागावी यासाठी मराठीतून रसाळ विज्ञानकथा आणि पुस्तकं लिहिल्यामुळे ते लोकप्रिय ठरले.
विज्ञानाचे विश्व विस्तारणारा प्रवास
१९३८ साली कोल्हापूर येथे जन्मलेले जयंत नारळीकर यांचे (Dr. Jayant Naralikar Passed Away) शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. त्यांच्या वडिलांनी बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुख म्हणून कार्य केले, तर आई संस्कृत विदुषी होत्या. शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठ गाठत त्यांनी बी.ए., एम.ए., पीएच.डी. आणि रँग्लर ही पदवी संपादन केली.
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात; ‘एक असा दौर येईल…’ हे शब्द ठरले खरे!
तेथील त्यांच्या काळातील अग्रगण्य खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी सहकार्य करत “हॉयल-नारळीकर सिद्धांत” मांडला. बिग बँग सिद्धांताला पर्यायी विचार मांडणारा हा सिद्धांत त्याकाळी चर्चेचा विषय ठरला होता.
भारतात परतल्यावर खगोल संशोधनाला नवे दिशा
१९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतात परत बोलावले. त्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम करत भारतीय खगोलशास्त्र संशोधनाला नवे दिशा दिली. पुढे त्यांनी (Dr. Jayant Naralikar Passed Away) पुण्यातील ‘आयुका’ (IUCAA) या संस्थेच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली.
विज्ञानकथांचा रसाळ लेखक
शास्त्रज्ञ म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी विज्ञानकथांच्या माध्यमातून सर्वसामान्य वाचकांपर्यंत विज्ञान पोहोचवले. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, चला जाऊ अवकाश सफरीला, व्हायरस, यक्षांची देणगी, टाइम मशीनची किमया यांसारख्या कथांनी वाचकांवर गारूड केले. त्यांच्या चार नगरांतले माझे विश्व या आत्मचरित्रासही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
Pune News: तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला
विविध पुरस्कारांनी गौरव
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना २००४ मध्ये पद्मविभूषण, २०१० मध्ये महाराष्ट्र भूषण आणि २०१४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एक युग संपले
“भारतातील खगोलशास्त्राचे आजचे जे स्थान आहे, त्याच्या पायाभरणीचे श्रेय डॉ. नारळीकर यांना जाते. ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने एक महत्त्वपूर्ण पर्व संपले,” अशा शब्दांत खगोलशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी शोक व्यक्त केला.
डॉ. नारळीकर यांच्या जाण्याने (Dr. Jayant Naralikar Passed Away) भारतीय विज्ञान आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या संशोधकाला अखेरची आदरांजली.