Team MyPuneCity – शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोथरूड येथील ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक (Pune Crime News 19 May 2025) करण्यात आली. ही फसवणूक १७ मार्च २०२५ ते १४ मे २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून करण्यात आली.
फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईलधारकाने स्वतःला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खात्रीशीर नफा मिळवून देतो, असे सांगून विविध व्यवहारांतून फिर्यादीकडून एकूण १६,००,००० रुपये उकळण्यात आले. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाने करत आहेत.
कोथरूड आणि एरंडवण्यात वृद्ध महिलांना लुटणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू (Pune Crime News 19 May 2025)
पुणे – कोथरूड आणि एरंडवणे परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोन वृद्ध महिलांचे एकूण १ लाख रुपयांचे दागिने हिसकावून पळ काढला. ही घटना १७ मे २०२५ रोजी रात्री १०.१५ ते १०.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी ७० वर्षीय महिला शिवणे येथील रहिवासी असून त्या व त्यांच्या सोबतच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावले. वाडेश्वर हॉटेलजवळ आणि सिध्दी सांज लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे येथे ही चोरी झाली. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.
Unseasonal Rain : पिंपरी-चिंचवडमध्ये संध्याकाळच्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ
पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत ५० हजारांचे दागिने चोरीला
पुणे – पीएमपीएमएल बसमधून स्वारगेट ते सासवडकडे प्रवास करत असताना एका ५३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची पाटली अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना १५ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली.
फिर्यादी या सांगली येथील रहिवासी असून त्या स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचे दागिने पळवले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
महागड्या १४ लाखांच्या घड्याळांची चोरी; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime News 19 May 2025)
पुणे – सी. टी. पंडोल ॲण्ड सन्स या महागड्या घड्याळांच्या शोरूममधून १४.३१ लाख रुपये किमतीची पाच राडो आणि लॉन्जीन्स घड्याळे चोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल व मे २०२५ दरम्यान घडली.
फिर्यादी यांच्या मते, दुकानातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या ओळखीच्या इसमासोबत संगनमत करून डिलिव्हरी चलनाच्या आधारे कोणतीही किंमत न देता महागडी घड्याळे चोरून नेली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; चालक व मालकाविरुद्ध गुन्हा
पुणे – केसनंद चौकात ट्रकच्या जोरदार धडकेत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना १८ मे २०२५ रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी यांच्या भावास ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चौकशीत समोर आले की चालकाकडे परवाना नव्हता आणि मालकाने त्यालाच ट्रक चालवायला दिला होता. वाघोली पोलीस ठाण्यात ट्रक चालक जनार्दन बाबुराव चव्हाण व मालक संतोष आत्माराम भंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार तपास करत आहेत.
हडपसरमध्ये झोपलेल्या इसमाच्या फ्लॅटमध्ये चोरी (Pune Crime News 19 May 2025)
पुणे – हडपसरमधील मगरपट्टा परिसरात एका फ्लॅटमध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना १७ मे रात्री ते १८ मे दुपारदरम्यान घडली.
फिर्यादी हे रात्री झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून चोरी केली. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
खंडणीसाठी महिलेचा छळ; तरुणाविरोधात गुन्हा
पुणे – ओळखीतून मैत्री झालेल्या तरुणाने एका ३१ वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत खंडणीची मागणी केली. ही घटना जानेवारी २०२५ पासून सुरू असून १७ मे २०२५ पर्यंत तिला सतत त्रास दिला जात होता.
फिर्यादी महिलेने सांगितले की, आरोपीने तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तसेच सतत फोन करून व मानसिक त्रास दिला. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
येरवड्यात घरफोडी करून १.८५ लाखांचा ऐवज चोरीला (Pune Crime News 19 May 2025)
पुणे – येरवडा परिसरातील सिद्धार्थ नगर येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना १७ मे ते १८ मे २०२५ दरम्यान घडली.
फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरील दोघांनी महिलेला लुटले; ९० हजारांचे दागिने गेले
पुणे – कात्रज परिसरात एका ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दोन दुचाकीस्वारांनी हिसकावली. ही घटना १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.
महिला रस्त्यावरून पायी चालत असताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात इसमांनी ही सोनसाखळी हिसकावून पळ काढला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
संगणक ऑपरेटरच्या नावे फसवणूक करून २.५ लाख रुपये लाटले (Pune Crime News 19 May 2025)
पुणे – एका खाजगी कंपनीत संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या खात्यातून अज्ञात व्यक्तींनी ऑनलाईन फसवणूक करून २ लाख ५० हजार रुपये काढून घेतले. ही घटना ३ मे २०२५ रोजी घडली.
फिर्यादी यांना अज्ञात इसमाने फोन करून बँक खात्याची माहिती घेतली आणि त्यानंतर ऑनलाईन व्यवहारातून पैसे काढले. मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दारुच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या युवकाने पोलीस कर्मचार्याला केली मारहाण
पुणे – फरासखाना परिसरात दारुच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने त्याला समजवायला आलेल्या पोलीस कर्मचारीस मारहाण केली. ही घटना १८ मे २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
पोलीस कर्मचारी संतोष कोकणे हे ड्युटीवर असताना आरोपीने त्यांच्याशी वाद घालून त्यांच्या गळ्यातील बॅच खेचून मारहाण केली. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.