Team MyPuneCity – निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान पुन्हा एकदा पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया (Nigdi Water Wastage) गेल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. भक्ति शक्ती उड्डाणपूलाजवळील श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण या रस्त्यावर पोर्टलँड मशीनच्या खोदकामादरम्यान ही दुर्घटना घडली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात पाण्याची नासाडी झाली असून, रस्त्यावर पाण्याचे लोट साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाण्याचा तुटवडा भासत असलेल्या उन्हाळ्यात अशा प्रकारे वारंवार पाणी वाया जाण्याच्या घटनांनी नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक
यापूर्वीही या भागात मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे अशाच प्रकारे पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया (Nigdi Water Wastage) गेल्याचे प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही समस्या वारंवार उद्भवत असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
निगडी परिसरात गेल्या काही महिन्यांत अशा घटनांची पुनरावृत्ती होत असून, त्यामुळे महापालिकेच्या जलपुरवठा व्यवस्थेवर ताण येत आहे. आधीच टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अडचणीत आले आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे या घटनेची तातडीने दखल घेऊन मेट्रो प्रकल्पातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावरील नागरिकांचे हाल वाढले असून, पाणीटंचाईच्या समस्येत (Nigdi Water Wastage) भर पडली आहे. महापालिका प्रशासन आणि मेट्रो प्रकल्प यांच्यात समन्वयाचा अभाव हे अशा घटनांचे प्रमुख कारण ठरत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.