३६ अनधिकृत बंगल्यांवर पालिकेने चालविला बुलडोझर; इंद्रायणी नदी घेणार मोकळा श्वास
Team MyPuneCity –चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रात भराव टाकून बांधलेले ३६ बंगले पाडण्याची कारवाई सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने आज (दि.१७) पहाटे पासून सुरू केली आहे.त्यामुळे आता इंद्रायणी नदीपात्र मोकळे होणार .
जेसीबी, पोकलनसह १० मशीन कारवाई आज पहाटे सुरू करण्यात आली आहे. प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी आहे. कारवाई रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी भरपूर प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. येथील नागरिकांनी रात्रीतून घरसामान हलविल्याने नुकसान टळले आहे.
Pimpri News : ‘इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो!’ – प्राचार्य प्रदीप कदम
चिखलीतील सर्व्हे नंबर ९० मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. या बांधकामामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन केलं.
इंद्रायणी पूररेषेतील हे बंगले पाडण्याचे हरित लवादाने आदेश दिले होते. मात्र, संबंधित रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने बांधकामे पाडण्याची कारवाई थांबली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने ही बांधकामे पडण्यावर शिक्कामोर्तब झाले . मात्र, पावसाळ्यात ही बांधकामे पाडता येणार नाहीत. महापालिकेला ही बांधकामे आता 31 मेपूर्वीच पाडावी लागणार होती.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने आज (दि.१७) पहाटे पासून कारवाई सुरू केली आहे .