Team MyPuneCity – वारजे पुलाजवळून कामावरून परतणाऱ्या एका मजुरास रिक्षात बसवून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावणाऱ्या दोघा सराईत लुटारूंना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १२ मे २०२५ रोजी रात्री घडली असून, पोलिसांनी लुटीचा पूर्ण मुद्देमालही जप्त केला आहे.
प्रभाकर पवार (वय ४५, रा. बावधन) हे मजूर काम संपवून घरी जाण्यासाठी वारजे पुलाजवळ थांबले होते. त्यावेळी एक रिक्षा थांबून त्यांना बावधनला सोडतो, असे सांगून त्यात बसवण्यात आले. डुक्करखिंडजवळ आल्यावर रिक्षा थांबवून रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार यांनी पवार यांना दोन्ही बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर दमदाटी करून खिशातील २ हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला. तसेच पोलिसांकडे गेला तर जीवे मारण्याची धमकी देत ते दोघे पळून गेले.
घटनेनंतर भीतीपोटी पवार यांनी तात्काळ तक्रार दिली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली व्यथा कामाच्या ठिकाणी ठेकेदाराला सांगितली. ठेकेदारासोबत ते वारजे पोलिस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल करण्यात आली.
वारजे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून दोन तपास पथके तयार केली. रिक्षाच्या वर्णनावरून शोधमोहीम सुरू केली असता पोलीस अंमलदार विजय भुरुक यांना एका रिक्षाचालकाने माहिती दिली की, संशयित रिक्षा कर्वेनगर भागात दिसली आहे. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, अंमलदार धनंजय देशमुख, विजय भुरुक, विक्रम खिलारी आणि संभाजी दराडे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित रिक्षा ताब्यात घेतली.
रिक्षाचालक आदित्य राम वाघमारे (वय २३, रा. करिश्मा चौक, कोथरूड) याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या साथीदाराचे नाव सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल (वय २०, रा. एकता कॉलनी, वारजे) असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून लुटलेला मोबाईल व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहा. आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, सहा. पोलीस निरीक्षक रणजित मोहिते व त्यांच्या पथकाने केली.