पत्नीचा गळा आवळून खून, मृतदेह भट्टीत जाळला, राख नदीत फेकली अन् भट्टीही केली नष्ट
माय पुणे सिटी न्यूज : चारित्र्याच्या संशयातून पतीने शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह लोखंडी भट्टीत जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी राख नदीत फेकून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लोखंडी भट्टीदेखील नष्ट करून टाकली आणि स्वतःच पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. (Husband Murders Wife) पत्नीप्रती प्रेम असल्याचा बनाव करत तो तक्रारीचा फॉलोअपही घेऊ लागला. पण, त्याच्या संशयास्पद वर्तणुक पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही आणि अखेर या पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघड झाले. एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही घटना पुण्यात घडली आहे.
या ‘दृश्यम’ स्टाईल मर्डरचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपी पतीने महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पती समीर पंजाबराव जाधव (वय ४२) याला अटक करण्यात आली. या पतीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानेच आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. (Husband Murders Wife) अंजली समीर जाधव (वय ३८, रा. श्री स्वामी समर्थ संकुल, एनडीए वारजे रस्ता, शिवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका होती. आरोपी समीर जाधव हा आरोपी फॅब्रिकेशन काम करतो. २०१७ ला त्याचे अंजलीशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, तरीही त्याने बायकोवर आरोप केले होते. तो पत्नीवर सतत संशय घेत असे. याच वादातून त्याने पत्नीची हत्या करायचे ठरवले. हत्येआधी आरोपीने दृश्यम चित्रपट तब्बल पाच वेळा पाहिला. त्यानंतर खेड शिवापूर जवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. (Husband Murders Wife) चार चाकी गाडीतून तो २६ ऑक्टोबरला पत्नीला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला आणि पत्नीचा गळा दाबून खून केला. तिथे उभारलेल्या भट्टीत पत्नीचा मृतदेह जाळून राख नदीत फेकून दिली. दुसऱ्या दिवशी स्वतःच पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. तक्रार दिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात जाऊन माझ्या पत्नीला कधी शोधणार याबाबत आत्मीयतेने चौकशी करायचा. त्याच्या या वर्तणूकीतून पोलिसांना संशय आला. पत्नी बेपत्ता झाली त्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज आणि कसून तपास केल्यावर पतीनेच हा खून केल्याचे समोर आले.


















