समाजमाध्यमातून प्रकटीकरणाचा सुळसुळाट -डॉ. सदानंद मोरे
पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित संवाद
Team My Pune City –कर्तृत्वशून्यतेने भाषेचा विकास होत नाही कारण भाषेचा विकास हा (Pune)कर्तृत्वावरच होत असतो. माणसाच्या जगण्याशी भाषेचा संबंध जोडता आला पाहिजे. मराठी लेखकांनी कादंबरी लिखाणाला न्याय दिला नाही. भाषेचा अभिजात दर्जा टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत परंतु माणासाला जगण्याची शाश्वती आली की तो भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करू शकेल. आपल्या कर्तृत्वाची क्षितिजे रूंदावत नेत भाषेचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व असले तरी समाज माध्यमातून व्यक्त होताना प्रकटीकरणाचा सुळसुळाट झालेला दिसून येतो ज्याला अभ्यासपूर्णतेची जोड नसते, अशी परखड मते ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने 23व्या पुणे पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. यात आज (दि. 31) डॉ. सदानंद मोरे यांच्याशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. आपटे रोडवरील सेंट्रल पार्क येथे पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. संदीप सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Pune Nagar Parishad Final Voter List-2025:पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या जाहीर
डॉ. मोरे पुढे म्हणाले, कथा लेखनात व्यक्तीला न्याय दिला जातो तर कादंबरी लेखनाचा पट मोठा असल्याने प्रत्येक पात्र त्याच्या जागी मांडावे लागते परंतु गद्य लेखकाचा कस कादंबरी लेखनातून लागतो. मराठी साहित्य क्षेत्रात मराठी लेखकांनी कादंबरी लेखनाला पुरेसा न्याय दिल्याचे जाणवत नाही. कादंबरीकाराने एकाच विचारप्रकाराच्या चौकटीत न अडकता लेखन करणे अपेक्षित आहे.
वैयक्तिक आवडी-निवडी दूर सारल्या…
लेखक, कवी, नाटककार, इतिहासकार, कादंबरीकार असे विविध साहित्यप्रकार लिलया हाताळत असताना इतिहासकार म्हणून ठळक ओळख निर्माण झाली असल्याने इतर भूमिका दुलर्क्षित राहिल्या का या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मोरे म्हणाले माणसाला आयुष्यात अनेक गोष्टी कराव्या असे वाटते पण काळ आणि शक्तीची मर्यादाही जाणून घ्यावी लागते. आपल्याला अभ्यासातून माहित झालेला खरा इतिहास समाजासमोर आणावा तसेच सामाजिक गरज म्हणून वैयक्तिक आवडी-निवडी बाजूला ठेवून कार्यरत राहिलो आहे.
उथळपणामुळे अभंगांचा मूळ भाव दूर गेला…
उत्तमोत्तम साहित्याकृती समाजापुढे नेण्यासाठी फिरते वाचनालय, प्रदर्शन अशा संकल्पना नक्कीच उपयोगी पडतात. प्रकाशक-लेखकाने वाचकांकडे जाणे यात वावगे काहीच नाही, असे मत नोंदवून डॉ. मोरे पुढे म्हणाले, आज कीर्तनकार या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर उथळपणा, विनोदात्मकता दिसून येते यामुळे अभंगाचा मूळ भाव, अर्थ बाजूलाच राहतो. कीर्तनकाराने सामाजिक प्रश्नांवर जरूर भाष्य करावे त्याकरिता संयमित विनोदबुद्धीचाही वापर व्हावा परंतु पारंपरिकता, आध्यात्मिक दृष्टीकोन आणि समाज जागृती याचा समन्वय साधणे आवश्यक आहे.
लेखन चिरंतन तर राजकारण क्षणिक…
आजच्या काळात राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे. राजकारणातील भाषा देखील असंस्कृत होत चालली आहे. अशा वेळी राजकारणी म्हणून घडलो नाही याबद्दल समाधान वाटते का? अशी विचारणा केली असता डॉ. मोरे म्हणाले, आज मी जे लिहू शकत आहे ते दुसऱ्याने लिहिले नसते. राजकारणातून बाहेर पडल्याने माझे मी पण माझ्या लिखाणातून टिकवून ठेवले आहे. लेखक म्हणून माझी जागा दुसऱ्या कुणी घेतली नसती. परंतु राजकारणात माझी जागा घेणारे अनेक जण होते. लेखन चिरंतन टिकणारे आहे तर राजकारण तात्पुरते, क्षणिक आहे, यामुळेच मी राजकारणातून बाहेर पडलो.
जातीच्या आधारे राजकारण करता येते हा विचार आज समाजात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. रोटी-बेटीच नव्हे तर मतदान पेटीतील व्यवहारातही जातीपाती आणि धर्माचे प्रस्थ आहे. याला राजकारणीच जबाबदार आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पुस्तक जत्रा व मराठी साहित्य मेळा अशा उपक्रमांमुळे वाचन संस्कृती वाढीस लागेल, असे मत डॉ. संदीप सांगळे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. स्वागत आणि आभार प्रदर्शन पी. एन. आर. राजन यांनी केले.


















